खेडमधील जिजामाता उद्यानातील डॉ़. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच खेडमध्ये आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने जमले. शहरात पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केली आहे.

खेड- दापोली मार्गावरील तीन बत्ती येथे जिजामाता उद्यान असून या उद्यानात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. सोमवारी सकाळी उद्यानात साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुतळ्याची विटंबना झाल्याचे लक्षात आले. रात्री समाजकंटकांनी या पुतळ्याची विटंबना केली. प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनेची माहिती प्रशासनाला दिली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे वृत्त समजताच रिपब्लिकन पक्षांचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. विटंबना करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. या घटनेनंतर खेडमध्ये बंदची हाक देण्यात आली.

रामदास कदम यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
खेडमधील घटनेची माहिती मिळताच काही कार्यकर्त्यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. रामदास कदम यांनी तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती कदम यांनी दिली.

विधान परिषदेत मुद्दा उपस्थित
खेडमधील घटनेचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. भीमा कोरेगाव प्रकरण ताजे असताना अशापध्दतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाची विटंबना सुरु आहे. या सरकारच्या काळात महापुरुषांच्या पुतळयांची विंटबना सुरु असून, समाजकंटकांना सरकारची भीती राहिलेली नाही असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.