आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शी कारभाराच्या जोरावर राज्यात नावलौकिक मिळविलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पाच दिवसांपूर्वी जाहीर झाली. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी अखेरच्या दिवशी कारखाना कार्यक्षेत्र व प्रवर्गानुसार असलेल्या एकूण दहा मतदारसंघांतून ११० उमेदवारांनी १५१ अर्ज दाखल केले.
कारखाना कार्यक्षेत्र, जात प्रवर्ग, संस्था अशा एकूण १० मतदारसंघांतून ११० उमेदवारांनी १५१ अर्ज दाखल केले. बेंबळी गटातून १८ उमेदवारांनी २७ अर्ज दाखल केले. केशेगाव गटात १३ उमेदवारांचे १३ अर्ज, उस्मानाबाद गटात १३ जणांचे २१, तेर गटात १६ जणांचे २२, चिखली गटात १० जणांचे १७, संस्था मतदारसंघात चित्राव गोरे यांचा एकमेव अर्ज, भटक्या जाती, जमाती प्रवर्गातून ६ अर्ज, इतर मागास प्रवर्गातून ५ जणांनी अर्ज दाखल केले. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून १०जणांनी १२ उमेदवारी अर्ज दाखल केले.
मंगळवारी नामनिर्देशनपत्र दाखल अर्जाची छाननी झाली. २५ फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. २६ फेब्रुवारीला पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होऊन याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. ८ मार्चला मतदान व १० मार्चला मतमोजणी होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याने सौर ऊर्जेवरील पहिला वीजनिर्मिती प्रकल्प उभारून देशातील सहकारी संस्थांना आदर्श घालून दिला. डिस्टीलरी प्रकल्प, उसाच्या रसातील पाण्याचा पुनर्वापर करण्याचे तंत्रज्ञान व इतर बाबींमध्येही सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला. या पाश्र्वभूमीवर कारखान्याच्या संचालक मंडळावर आपली वर्णी लागण्यासाठी सभासदांनी प्रयत्न सुरू केले आहेत.