करोना टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र दारूची दुकानं सुरू केल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी राज्य सरकार अतार्किक असल्याची टिका केली होती. त्यांच्या या टिकेला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिले आहे. दारूबंदी या विषयावर डॉ. बंग यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला देऊन देशातच दारूबंदी घडवून आणावी अशी विनंती केली आहे.
आज आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूरात आलेले असताना त्यांनी डॉ. बंग यांच्या वक्तव्यावर भाष्य केले. दोन दिवसांपूर्वी डॉ. बंग यांनी करोनाच्या टाळेबंदीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दारूची दुकानं सुरू केल्याबद्दल सडकून टीका केली होती.
“राज्य शासनाचा हा निर्णय अतर्क आहे तर मग डॉ. बंग यांनी देशभरातच दारूबंदीची मागणी लावून धरावी. डॉ. बंग यांचे सामाजिक कार्य मोठे आहे, ते व्यक्ती म्हणूनही मोठे आहेत. जी माहिती सरकारकडे उपलब्ध नसते, ती सर्व माहिती डॉ. बंग यांच्याकडे असते. देशात वर्षाला पाच लाख लोक दारूमुळे मृत पावतात असा त्यांचा दावा आहे. मात्र, सरकार, देश व राज्य चालविण्यासाठी पैसा लागतो. त्यांची स्वयंसेवी संस्था चालविण्यासाठीही पैसा लागतो. आज सर्व उद्योग बंद आहेत, लाखो लोकांचा रोजगार गेला आहे. अशा स्थितीत अर्थव्यवस्थेला बळकळी करण्याचे काम दारू व्यवसाय करीत असेल तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. डॉ. बंग यांनी हाच सल्ला माजी मुख्यमंत्र्यांना दिला असता तर योग्य झाले असते. त्यांचे चिरंजीव मागील पाच वर्षात माजी मुख्यमंत्र्यांसोबत काम करीत होते,” अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी डॉ. बंग यांना टोलाही लागवला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 6, 2020 9:13 pm