औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. भालचंद्र कांगो यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कामगार चौकातून मिरवणुकीने ढोल-ताशाच्या गजरात रॅली काढून त्यांनी अर्ज भरला. या मतदारसंघाचे आमदार राजेंद्र दर्डा यांच्यावर विशिष्ट वर्गाचे हितसंबंध जोपासल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली.
कामगार चौकाचा माहोल गुरुवारी काही वेगळाच होता. एरवी चौकात झेंडे घेऊन उभे राहणारे कार्यकर्ते युती वा आघाडीचे असतात. मात्र, सकाळी हातात लाल झेंडा, त्याच रंगाच्या टोप्या घातलेल्या कार्यकर्त्यांनी जिंदाबादचा नारा दिला. उघडय़ा जीपमधून डॉ. कांगो, अभिनेत्री मयुरी कांगो, नाटय़क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. प्रा. अजित दळवी, मोहन फुले, प्रज्ञा सुमंत, पद्मनाभ पाठक आदी सहभागी झाले होते. डाव्या विचारांच्या संघटनांचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते.
अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकांराशी बोलताना कांगो यांनी निवडणूक रिंगणात कोणत्या भूमिकेने उभा आहे, हे पत्रकारांना सांगितले. गेल्या काही दिवसांत शालेय शिक्षणमंत्री दर्डा यांनी केलेल्या ‘अच्छे आदमी’ या घोषवाक्यावरही मत व्यक्त केले. एका विशिष्ट वर्गाच्या हितसंबधांचेच रक्षण त्यांनी केले. ते कोणासाठी अच्छे, कोणासाठी वाईट असा प्रश्न नाही. पण ते चांगल्या धोरणाचा पाठपुरावा करूशक ले नाहीत. आघाडी व युतीच्या नेत्यांनी शहराची ‘मिलीजुली’ संस्कृ ती नष्ट केली. ती पुनस्र्थापित व्हावी, हा उमेदवारीमागचा उद्देश असल्याचे सांगत, विधिमंडळात असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांची तड, गुंठेवारीचा प्रश्न व जायकवाडीचे पाणी हा विकासात या कळीच्या मुद्दय़ांची तड लावता यावी, म्हणून रिंगणात उतरल्याचे सांगितले.
दरम्यान, या मतदारसंघातून ९ उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले. मोहम्मद किस्मत कासीम, पटेल शेख सलीम, मोबीनउद्दीन खदीरउद्दीन सिद्दीकी, शेख रफीक शेख रज्जाक, शेख अ. रऊफ, लक्ष्मण प्रधान, नितीन पुंडलिक घुगे आणि साजिद बेगू पटेल अशी इच्छूक उमेदवारांची नावे आहेत.