डॉ. इलियास खान यांचा रायिडगचा विक्रम

दिल्ली असोसिएशने घेतलेल्या ‘ब्रदरहूड ऑफ एडिक्टेड रायडर्स’ या पुणे-कर्नूल-पुणे स्पध्रेत २ हजार ४४५ किलोमीटर अंतर सुपर बाईकवरुन केवळ ३० तासांत पूर्ण करुन टफेस्ट रायडरचा विक्रम येथील जिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. इलियास खान यांनी पुणे येथे नुकताच नोंदवला.

वडिलांच्या बुलेटमुळे लहानपणापासून लागलेला सुपर बाईकचा लळा विक्रमाच्या दिशेने घेऊन जाणारा ठरला. वैद्यकीय शिक्षणानंतर स्वतच्या पायावर उभे राहिल्यानंतरही बाईकचा छंद वाढत गेला आणि हार्ली डेव्हिडसन, सुझुकी हायाबोसा, निजा अशा नामांकित बाईकवरुन सुरू झालेल्या प्रवासाने आता ४ हजार ८०० किमी अंतर कमीतकमी वेळेत पूर्ण करण्याच्या ध्येयाकडे गेला.

जिल्हा रुग्णालयात तीन वर्षांपासून बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. इलियास खान (वय ३७) यांनी पुणे येथे गेल्या २ एप्रिलला झालेल्या ‘ब्रदरहूड ऑफ एडिक्टेड रायडर्स’ स्पध्रेत हा विक्रम नोंदवला. केवळ मोठय़ा शहरांमध्ये होत असलेल्या बाईक रायिडग स्पध्रेबाबत डॉ. इलियास यांनी सांगितले की, वडील अब्दुल समद यांच्याकडील बुलेट गाडीमुळे लहानपणापासूनच सुपर बाईकचा छंद जडला. हार्ली डेव्हिडसन बाईक पाहिल्यानंतर ती घेण्याची त्यांची इच्छा होती. पण उच्च शिक्षणानंतर स्वत: ही बाईक खरेदी केली. यातील तीन प्रकारच्या गाडय़ा चालवल्या. सुझुकी हायाबोसा, निजा या नामांकित बाईकही हाताळल्या. बाईक रायडर बनण्याच्या जिद्दीमुळे वेगवेगळ्या बाईकच्या प्रवासातून आत्मविश्वास वाढला.

पुणे येथे गेल्या डिसेंबरमध्ये इंडिया सुपर बाईक फेस्टिव्हलमध्ये पहिली लाऊडेस्ट सुपर बाईक ट्रॉफी जिंकली. त्यानंतर इंटरनेटवर वर्ल्ड टफेस्ट रायडरच्या नावांची नोंद पाहून आपणही त्यांच्यासारखे नाव कमवावे, अशी इच्छा निर्माण झाली. गोवा, पुणे, मुंबई, औरंगाबाद येथून बीडपर्यंतचा प्रवास नेहमी सेमी स्पोर्टसने (नेकेट बाईक) केला. यातूनच सराव होत गेला आणि मोठय़ा अंतराच्या स्पध्रेत भाग घेण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. २ एप्रिलला दिल्ली असोसिएशन आयोजित ब्रदरहूड ऑफ एडिक्टेड रायडर्स स्पध्रेत सहभाग घेतला. त्यात ८०० कि.मी., १ हजार ६०० कि.मी. आणि २ हजार ४४५ कि.मी. अंतर ठराविक वेळेत पार करायचे होते.

मित्र अमित हौजवाला(औरंगाबाद) यांच्यासोबत ३६ तासांत २ हजार ४४५ कि.मी. अंतर पूर्ण करण्याचे ध्येय समोर ठेवून स्पध्रेत उतरलो आणि तीस तासांत पुणे-कर्नूल-पुणे हे २ हजार ४४५ कि.मी. अंतर पूर्ण केले. दिवसा ४२ ते ४४ अंश तापमान असताना रात्रंदिवस प्रवास करत १३ पंपांवर पेट्रोल भरुन त्याच ठिकाणी जेवण करुन लक्ष्य पूर्ण केले.

इतर स्पर्धक क्रुझर किंवा टुरर बाईक वापरत असल्याने त्यांना पाठदुखी, मानेचा त्रास होत नाही. परंतु डॉ. खान यांनी सेमी स्पोर्टस (नेकेट बाईक) वापरुन हे अंतर पूर्ण केले.

नेहमीचा सराव, जिममुळे मिळालेला फिटनेस आणि आत्मविश्वासाने हा विक्रम नोंदविता आला. जगातील टफेस्ट रायडरमध्ये माझे आणि अमितचे नाव गणले जाणार, हा आनंद आमच्यासाठी सर्वात मोठा असल्याचे डॉ. इलियास खान यांनी सांगितले. बाईक रायिडगमधील ध्येय एवढय़ावरच थांबणार नसून अमित हौजवाला, नरेश तांबारे (परळी) यांना सोबत घेऊन चेन्नई-दिल्ली-मुंबई हे ४ हजार ८०० कि.मी.चे अंतर कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.