औरंगाबाद शहरात राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे बांधण्यात आलेल्या मोंढा नाका उड्डाणपुलास माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे, अशी मागणी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. महापालिका आयुक्त, मुख्य अभियंता यांना या अनुषंगाने आमदार चव्हाण यांनी पत्र दिले.
औरंगाबाद शहराशी कलाम यांचा ऋणानुबंध होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ५३व्या पदवीदान समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ते आले होते. त्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. ते जेव्हा जेव्हा औरंगाबादला आले तेव्हा तेव्हा त्यांच्याकडून हजारो तरुणांना काही ना काही शिकायला मिळाले. विज्ञान आणि युवकांसाठी कलाम यांनी मोठे योगदान दिले. विज्ञान क्षेत्राची पोकळी तर न भरून निघणारी आहे, असे मत व्यक्त होत आहे. शहरातील विविध संस्थांमध्ये डॉ. कलाम यांना मंगळवारी श्रद्धांजली वाहण्यात आली.
विद्यापीठात श्रद्धांजली
कोणत्याही देशाची ओळख तेथील विद्यापीठे किती मोठी आहेत, यावरून होत असते. भारतातील विद्यार्थी, शिक्षकांच्या जीवनात प्रेरणेचा अखंड स्रोत म्हणून कार्यरत राहिलेले डॉ. अब्दुल कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने डॉ. कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. चोपडे म्हणाले, की डॉ. कलाम यांना डी.लिट देणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच विद्यापीठ आहे. १९९९मध्ये या मानद पदवीने सन्मानित केले. मार्च २०१३मध्ये ५३व्या दीक्षान्त सभारंभास ते उपस्थित राहिले होते. या दोन्ही वेळी डॉ. कलाम यांनी केलेले मार्गदर्शन आजही अनेकांच्या स्मरणात आहे.