News Flash

अमेरिका ते चितेगाव ग्रामपंचायत सदस्य… एका डॉक्टरच्या प्रेरणादायी प्रवासाची ‘कल्याण’कारी गोष्ट

नवनियुक्त ग्राम पंचायत सदस्य डॉ. कल्याण कुमार यांचा थक्क करणारा प्रवास

– रवींद्र जुनारकर

वडील बिहारचे तर आई उत्तर प्रदेशची. जन्म झारखंड राज्यातील जमशेदपूरचा. शिक्षण मध्यप्रदेश, बिहार, दिल्ली व महाराष्ट्र या चार प्रमुख राज्यांसह थेट अमेरिकेत. नंतर लग्न बंगाली मुलीसोबत झालं. हा प्रवास इथचं संपला नाही तर नंतर दिल्लीतील त्रिमुर्ती भवनातील सहायक प्राध्यापकाची नोकरी सोडून मुल तालुक्यातील चितेगावची कार्यक्षेत्र म्हणून निवड केली. त्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकीली… हा असा बारा गावचं पाणी प्यायलेला वैविध्यपूर्ण प्रवास आहे चितेगावचे नुकतेच निवडून आलेले ग्राम पंचायत सदस्य डॉ. कल्याण कुमार यांचा. गाव खऱ्या अर्थाने समृध्द करण्यासाठी या उच्चविद्याविभूषीत युवकाने ग्राम पंचायत निवडणुकीपासून राजकीय आयुष्याची सुरूवात केली आहे.

असं झालं प्रथामिक शिक्षण

श्रमिक एल्गार प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलेले डॉ. कल्याण कुमार यांची नाळ मागील दहा-बारा वर्षापासून मुल तालुक्यातील चितेगाव या छोट्या खेडेगावाशी जुळली आहे. अमेरीकेत शिक्षण घेतलेला उच्च विद्या विभूषित युवक ते ग्राम पंचायत सदस्य पदापर्यंतच्या त्यांच्या इथवरच्या प्रवासाची कथा मोठी रंजक आहे. आई उत्तर प्रदेशची तर वडील बिहारचे असले तरी डॉ.कल्याण कुमार यांचा जन्म झारखंड राज्यातील जमशेदपूरचा आहे. मूळचे बिहारचे असलेले डॉ.कल्याण कुमार यांचे वडील आयुध निर्माणीत डॉक्टर म्हणून सेवेत होते. केंद्र सरकारची नोकरी असल्याने वडीलांची आयुध निर्मीती असेल तिथे बदली व्हायची. याच बदलीच्या काळात त्यांनी भद्रावती येथे पहिली व दुसऱ्या वर्गापर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर मध्यप्रदेशातील जबलपूर, इटारसी, कटनी, ग्वालियर येथे वास्तव्याला असताना बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले.

मी राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतिक

बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कल्याण यांनी पटना येथे पदवीचे शिक्षण घेतले. त्याच दरम्यान दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे कामगारांचा इतिहास या विषयात पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर अमेरीकेत उच्च शिक्षणासाठी गेले. तिथे त्यांची भेट श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्यासोबत झाली. हीच भेट त्यांना चंद्रपुरात आणि चितेगाव येथे घेवून आली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि कालांतराने दोघांनी विवाह केला. या दरम्यान डॉ.कल्याण कुमार दिल्लीच्या त्रिमुत्री भवनात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. याच काळात आपण देशात सर्वत्र प्रवास केला आणि बिहार येथून थेट चितेगावात पोहचल्याचे डॉक्टर गंमतीने सांगतात. माझा जन्म झारखंडचा, शिक्षण मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, दिल्ली व अमेरिकेत झाले. वडील बिहारचे, आई उत्तर प्रदेशची तर पत्नी बंगाली आहे. आता कार्यक्षेत्र चितेगाव असल्यामुळे त्यामुळे मी खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे, असंही डॉ.कल्याण कुमार हसत हसत सांगतात.

…म्हणून निवडणूक लढलो, आता ध्येय आहे

चितेगाव येथील ग्रामस्थांच्या आग्रहास्तव ग्रामपंचायत निवडणूकीच्या रिंगणात उतरलो. या गावातून सर्व सदस्य बिनविरोध निवडून यावेत अशी माझ्यासह ग्रामस्थांची इच्छा होती. त्यासाठी ग्रामसभेच्या दोन बैठकाही झाल्या. परंतु शेवटी लोकशाही आहे. त्यानुसार निवडणूक झाली. एकूण सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत आमचे सहा सदस्य निवडून आले. आता आम्हाला गावाचा विकास करायचा आहे. शासकीय निधी गावाकडे कसा वळविता येईल याकडे लक्ष द्यावे लागेल. शासकीय पध्दतीत सरळ निधी दिला जात नाही. त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो, लॉबिंग देखील करता आले पाहिजे. त्यामुळे आमचा पहिला प्रयत्न हा जास्तीत जास्त निधी खेचून आणणे हा राहणार आहे. त्यानंतर एल्गार प्रतिष्ठानच्या माध्यमातून असंख्य संस्था, देशविदेशातील यंत्रणांशी संबंध असून त्याचा कसा वापर करता येईल हे ठरवायचं आहे. सीएसआरच्या माध्यमातून खासगी संस्थांचा निधी गावाच्या विकासाकडे आणण्यास प्राधान्य असेल.

गावाला जास्तीत जास्त निधी मिळवून द्यायचा

देशविदेशातील संस्थांचा एखाद्या खासगी संस्थेला निधी देतात, तसे गावासाठी देखील निधी मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे डॉ. कल्याण कुमार यांनी सांगितले. उच्च विद्या विभूषीत असूनही लोकसभा, विधानसभा किंवा जिल्हा परिषद निवडणुकीऐवजी मुद्दाम ग्रामपंचायतीची निवड केल्याचेही कल्याण यांनी सांगितले. विशेष म्हणजे डॉ.कल्याण कुमार यांनी चंद्रपूरच्या शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकीली करण्यासोबतच पत्नी अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांना त्यांच्या सामाजिक कार्यात मदत करत असतात. याच सामाजिक कार्याच्या बळावर त्यांनी निवडणुकीतील हा विजय मिळविला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 3:30 pm

Web Title: dr kalyan kumar journey from jharkhand to maharashtra grampanchayat election via usa scsg 91
Next Stories
1 नाना पटोलेंच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत खळबळ; म्हणाले…
2 वाई न्यायालयाकडून उदयनराजेंची निर्दोष सुटका
3 अखेर ‘संभाजी बिडी’चं नाव बदललं, आता ‘या’ नावाने होणार विक्री
Just Now!
X