कोणताही समाज सांस्कृतिकदृष्टय़ा समृद्ध असतो, तेव्हाच त्याची उंची वाढते. कला-संस्कृतीशिवाय जीवनात आनंद नाही. आयुष्यात खराखुरा आनंद मिळवायचा असेल, तर तो कलेतूनच प्राप्त होतो, असे प्रतिपादन राज्यमंत्री फौजिया खान यांनी केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘परभणी भूषण’ पुरस्कार श्रीमती खान यांच्या हस्ते प्रसिद्ध गायक, सुरमणी डॉ. कमलाकर परळीकर यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर प्रताप देशमुख होते. व्यासपीठावर शकुंतला परळीकर, ज्येष्ठ पत्रकार हेमराज जैन, डॉ. शिवाजी दळणर, तहसिन अहमद खान, आयोजक रमेश गोळेगावकर, देविदास कुलकर्णी आदी उपस्थित होते. शाल, श्रीफळ, मानपत्र व रोख ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आज सांस्कृतिक क्षेत्रात परभणी समृद्ध शहर असून, साहित्य, कला, संस्कृती क्षेत्रात योगदान देणारे अनेक मान्यवर येथे राहतात. दरवर्षी एका मान्यवराला ‘परभणी भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. या निमित्ताने आपण कलावंतांविषयी कृतज्ञताच व्यक्त करीत असतो. संगीत क्षेत्रात डॉ. परळीकर यांचे योगदान मोठे असून त्यांनी अनेक तरुण गायकांना घडवले, असे गौरवपूर्ण उद्गार खान यांनी काढले.
महापौर देशमुख यांनी सांस्कृतिक क्षेत्रात परभणी शहराची ओळख असल्याचे सांगून शहरातील कलावंतांना व्यासपीठाची आवश्यकता प्रतिपादन केली. संगीत क्षेत्रात डॉ. परळीकर यांनी निर्माण केलेला आदर्श शहराचा लौकिक वाढवणारा आहे, असेही ते म्हणाले. जैन यांनी परभणीच्या सांस्कृतिक जगताचा आढावा घेतला. डॉ. दळणर यांनी कलावंतांच्या योगदानातूनच शहराला स्वतची ओळख प्राप्त होत असते. जे कलावंत निष्ठेने आपल्या कलेची साधना करतात ते एका अर्थाने समाजाला योगदानच देत असतात, असे म्हटले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. परळीकर यांनी आपण या शहराविषयी नेहमीच कृतज्ञ राहू. कारण या शहरातच आपली कारकीर्द घडली. एखाद्या क्षेत्रात निष्ठेने काम करताना या कामाची नोंद घेतली गेली, तर आपल्या कार्याचेही सार्थक झाल्याचे वाटते, अशी भावना व्यक्त केली.
गोळेगावकर यांनी प्रास्ताविकात शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राचा आढावा घेऊन हा उपक्रम आणखी व्यापक केला जाईल, असे सांगितले. अरुण चव्हाळ यांनी सूत्रसंचालन केले. अभय कुलकर्णी यांनी मानपत्राचे वाचन केले. देविदास कुलकर्णी यांनी आभार मानले. पुरस्कार वितरण समारंभानंतर परळीकर यांचे शिष्य मल्हारीकांत देशमुख, कृष्णा लव्हेकर आदींनी अभंग, गझल, बंदीश यांचे सादरीकरण केले. डॉ. परळीकर यांनी गायिलेल्या ‘जो भजे हरी को सदा’ या भरवीने सांगता झाली.