सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी कारभार करीत असताना स्वपक्षातील पदाधिका-यांकडूनच जाणीवपूर्वक हेटाळणी केली जात असल्यामुळे वैतागून अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. परंतु यात शेवटी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची पुरती नाचक्की होणार असल्यामुळे शेवटी स्थानिक पक्षश्रेष्ठींनी डॉ. माळी यांची समजूत काढून त्यांना राजीनामा देण्यापासून परावृत्त केले. दरम्यान, उद्या शुक्रवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सांगोला येथे येणार असून त्यावेळी आपण पवार यांची भेट घेऊन आपली व्यथा त्यांच्या कानावर घालणार असल्याचे डॉ. माळी यांनी सांगितले.
अध्यक्षपदाचा मान ठेवला जात नाही. केवळ गाडी व शिपायापुरतेच आपले अस्तित्व असेल तर ते मान्य नाही, अशी भूमिका घेत डॉ. निशिगंधा माळी यांनी जिल्हा परिषदेतील आपल्या सहकारी पदाधिका-यांकडून होणारी हेटाळणी चव्हाटय़ावर मांडली होती. राजकीय वरदहस्त नसलेल्या कोणत्याही महिला लोकप्रतिनिधीला जिल्हा परिषदेत काम करणे कठीण असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. त्यांनी दररोज होणा-या आपल्या अपमानाविरूध्द अखेर आक्रमक पवित्रा घेत पदर खोचला आणि थेट अध्यक्षपदाच्या खुर्चीवर लाथ मारून स्वाभिमानाने घरी बसण्याचा निर्णय जाहीर करताच  जि. प. च्या सत्तेवर अंकुश असलेल्या राष्ट्रवादीतील स्थानिक नेते मंडळी खडबडून जागी झाली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना संधी देण्याची ऐतिहासिक भूमिका शासनस्तरावरून कृतीत आणली असताना त्यांच्या पक्षातील व त्यांच्याच नावाने राजकारण करणा-या नेते मंडळींनी डॉ. निशिगंधा माळी यांना जि. प. च्या कारभारात योग्य प्रकारे प्रोत्साहन न देता उलट, त्यांची हेटाळणी करून पवार यांच्या महिलांविषयक उदात्त धोरणाला ‘नख’ लावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
तथापि, डॉ. माळी यांनी स्वाभिमान शाबूत ठेवून पदर खोचून आक्रमक भूमिका स्वीकारताच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते मंडळींनी भानावर येत डॉ. माळी यांची मनधरणी करीत त्यांना पदाचा राजीनामा देण्यापासून परावृत्त केले. त्यामुळे आपण पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय तूर्त स्थगित केल्याचे डॉ. माळी यांनी सांगितले. दरम्यान, उद्या गुरूवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सांगोल्यात येत असून त्यावेळी आपण त्यांची भेट घेऊन व्यथा मांडणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.