निसर्ग हा मानवाचा मित्र व दाता आहे. आपण घेणारे आहोत. असे असूनही गेल्या ५० वर्षांत निसर्गाला ओरबाडून त्याचा नाश करण्याचा सपाटा मानवाने चालविला. त्यामुळे भविष्यात पृथ्वीचे रूपांतर मोठय़ा वाळवंटात होईल आणि त्यावर जीवसृष्टी जिवंत राहूच शकणार नाही, असे प्रतिपादन विविध वक्त्यांनी पुस्तक प्रकाशनप्रसंगी भाषणातून व्यक्त केले.
प्रा. डॉ. अनिल मुंगीकर यांनी लिहिलेल्या ‘पानाचे श्लोक’, ‘वनस्पती स्रोत’ व ‘पर्यावरणाच्या कहाण्या’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन लक्ष्मीकांत धोंड, प्रा. डॉ. छाया महाजन, डॉ. दिलीप पोकळे यांच्या उपस्थितीत झाले. अध्यक्षस्थानी पक्षितज्ज्ञ डॉ. दिलीप यार्दी होते. लक्ष्मीकांत धोंड म्हणाले, की निसर्गाला ओरबाडण्याची क्रिया गेल्या ५० वर्षांत अत्यंत वेगाने वाढली. आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. वाढत जाणारे तापमान कमी करण्याची गरज असून, ‘पर्यावरणाच्या कहाण्या’ वाचून त्या मुलांना सांगाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. महाजन यांनी, निसर्ग हा शिक्षक व मित्र आहे. निसर्गासारखे दातृत्व कोणाकडेही नाही. श्लोकाचा संबंध सत्त्वगुणांशी जोडला असून संतांनी त्याद्वारे आपले प्रबोधन केले, असे सांगून ‘पानाचे श्लोक’ पुस्तकाचा उपयोग संशोधनाकडे वळण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. यार्दी यांनी अध्यक्षीय समारोप करताना या पुस्तकांची पारायणे व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. औरंगाबादची लोकसंख्या सुमारे १५ लाख आहे. झाडांची संख्या ३० लाख असायला पाहिजे, प्रत्यक्षात ती केवळ तीन लाख म्हणजे १० टक्केच आहे. त्यामुळे औरंगाबाद ‘रेड झोन’मध्ये गेले आहे, असे सांगितले. रजन प्रकाशनचे अशोक कुमठेकर यांनी सूत्रसंचालन केले.