15 November 2019

News Flash

संजीव पुनाळेकरांनी हत्यारांची विल्हेवाट लावण्यास मदत केली, सरकारी वकिलाची माहिती

'मी दाभोलकर प्रकरणातील आरोपींच्या वतीने खटला लढत असल्याने मला अटक करणं चुकीचं'

(आरोपींना न्यायालयातून बाहेर आणताना, छायाचित्र सौजन्य- एएनआय)

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी काल(दि.26) सीबीआयने मुंबई येथून विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना अटक केली. यानंतर सीबीआयने या दोघांना पुणे न्यायालयात हजर केले असता आरोपी विक्रम भावे याने रेकी केली आणि संजीव पुनाळेकर यांनी गुन्ह्यातील हत्यारांची विल्हेवाट लावण्यास मदत केली असल्याची माहिती सीबीआयचे विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली. यानंतर न्यायालयाने दोघांना 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी आणि बचाव पक्षाचे वकील म्हणून विरेंद्र इचलकरंजीकर यांनी काम पाहिले.

न्यायालयात युक्तिवाद करताना आरोपी संजीव पुनाळेकर म्हणाले की, कर्नाटक पोलिसांनी नोंदवलेल्या शरद कळसकरच्या जबाबाच्या आधारे मला अटक करण्यात आली आहे. मी मागील अनेक महिन्यापासून दाभोलकर प्रकरणातील आरोपींच्या वतीने खटला लढत आहे. मी त्यांचा वकील असल्यामुळे माझ्यावर अशा प्रकारे कारवाई करणे चुकीचे आहे. तसेच विक्रम भावे हे देखील माझ्याबरोबर काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणेही योग्य होणार नाही. असा युक्तिवाद यावेळी स्वतः संजीव पुनाळेकर यांनी न्यायालयात केला.

यावर सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी युक्तिवाद करताना म्हणाले की, दाभोलकरांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांनी वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यासाठी विक्रम भावेची चौकशी करणे आवश्यक आहे. तसेच संजीव पुनाळेकर याने दाभोलकर आणि गौरी लंकेश हत्याप्रकरणात वापरलेले पिस्तुल नष्ट करण्यासाठी देखील मदत केली आहे. त्यामुळे या संपूर्ण व्यापक कटाची माहिती उघडकीस आणण्यासाठी विक्रम भावे अणि संजीव पुनाळेकर या दोघांची चौकशी करणे गरजेचे आहे. असा युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने दोघांना 1 जूनपर्यंत न्यायाधीश एस. एम. सोनवणे यांनी सीबीआय कोठडी सुनावली.

First Published on May 26, 2019 4:14 pm

Web Title: dr narendra dabholkar murder case court updates regarding adv sanjeev punalekar and vikram bhaves cbi custody