गेल्या पाच वर्षांत देशात विचारवंताच्या हत्या पाहता त्यांचे आवाज दाबण्याचे काम सुरु आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्रित येऊन आवाज उठवण्यासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यात सोमवारी विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी अभिनेते अमोल पालेकर हे यात सहभागी झाले होते. पालेकर म्हणाले, नरेंद्र दाभोलकर यांच्यानंतर आणखी चार हत्या झाल्या आहेत. या सर्व हत्यांचा तपास संथगतीने सुरु आहे. दाभोलकर यांची हत्या होऊन पाच वर्षांचा काळ लोटला असून नुकतेच या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली. यावरून हत्या घडवणाऱ्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यास आणखी किती वेळ लागणार असा सवाल त्यांनी विचारला.

मे २०१४ ते सप्टेंबर २०१५ या दरम्यान तपासात कोणतीही प्रगती झाली नव्हती. कोर्टाने दिलेले आदेशच आता १०० पानांपेक्षा जास्त झाले आहे. तपास यंत्रणांमध्ये समन्वय नसून आता ज्या आरोपींना अटक झाली आहे, त्यांना तातडीने शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. हा लढा तीव्र केला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, मेधा पानसरे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधताना भाजपावर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात मागील पाच वर्षांमध्ये चार विचारवंताची हत्या झाली. महाराष्ट्रातील तपास यंत्रणेचा वेग मंदावला आहे तर दुसरीकडे कर्नाटकमध्ये दुसऱ्या विचारांचे सरकार असूनही समाधानकारक तपास होतोय. महाराष्ट्रात भाजपा सरकार असल्यानेच तपासाला गती मिळू शकली नाही, असा आरोप त्यांनी केला.