महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच पुनाळेकर आणि भावे यांनी जामिनासाठी अर्ज केला असून त्यांच्या अर्जावर 7 जून रोजी सुनावणी करण्यात येणार आहे.

अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपींकडून बाजू मांडणारे अ‍ॅड. पुनाळेकर आणि त्यांच्याकडे कामाला असलेला लिपिक भावे याला सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. युक्तीवादानंतर पुन्हा त्यांना 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, त्या दोघांना आज पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि पनवेलमधील थिएटरमध्ये ४ जून २००८ बॉम्बस्फोट करण्यात आला होता. याप्रकरणी विक्रम भावेला दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर त्याला 10 वर्षांची शिक्षाही ठोठावण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर होता.