डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी गृह खात्याच्या अपयशावरून गरमागरम चर्चा होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर विधिमंडळात काय भूमिका मांडायची यावरून गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गृहपाठ सुरू केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तपासाचा आढावा घेतानाच काय उत्तर द्यायचे याची तयारी गृह खात्याने सुरू केली आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रात्री आर. आर. पाटील यांनी गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक, पुणे पोलीस आयुक्त आदींबरोबर सुमारे दोन तास चर्चा करून तपासाचा आढावा घेतला. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांकडून कोणतेही ठोस धागेदोरे हाती लागले नसल्याने पोलिसांचा तपास अजूनही अंधारातच सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी मारेकऱ्यांचा सुगावा लागला असून लवकरच त्यांना अटक होईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली होती. शिंदे यांच्या विधानामुळे राज्य सरकारच्या गृह खात्याची पंचाईत वाढली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन संशयितांकडून जप्त करण्यात आलेले रिव्हॉल्व्हर  आणि दाभोलकर यांच्यावरील हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले रिव्हॉल्वर यांचे नमुने जुळत असले तरी दाभोलकर यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ्या याच रिव्हॉल्वरमधील असल्याबाबत बॅलेस्टिक लॅब तज्ज्ञांच्या अहवालात स्पष्ट झालेले नाही.