डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे डॉ. पंडित विद्यासागर यांनी मावळते कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्याकडून शुक्रवारी स्वीकारली.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. विद्यासागर गेल्या ४ सप्टेंबरपासून कार्यरत आहेत. डॉ. पांढरीपांडे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ‘बामू’चा अतिरिक्त कार्यभार डॉ. विद्यासागर यांच्याकडे सोपविला. तत्पूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. पदभार सोपविल्यानंतर आजी-माजी कुलगुरूंनी विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. बदलत्या परिस्थितीत पुण्या-मुंबईकडेच गुणवत्तेची मक्तेदारी राहिली नाही. औरंगाबाद, नांदेड, जळगावसारखी शहरेही गुणवत्तेची केंद्रे व्हायला हवीत. दोन्ही विद्यापीठांचा कुलगुरू या नात्याने मराठवाडय़ात उच्च शिक्षणातील गुणवत्ता, संशोधनाच्या दर्जासाठी आपण प्रयत्न करू, असे डॉ. विद्यासागर यांनी सांगितले. डॉ. आंबेडकर यांच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठात संधी मिळाली, हा आपण गौरव समजतो. डॉ. पांढरीपांडे यांच्या कार्यकाळात विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्तेचा दबदबा निर्माण केला. ‘अ’ दर्जाचे मानांकन मिळाले, ही संपूर्ण मराठवाडय़ासाठी अभिमानाची बाब आहे, असेही ते म्हणाले.
विद्यापीठात लाभलेले सर्वाचे सहकार्य, प्रेम व आठवणींची शिदोरी घेऊन मी हैदराबादला जात आहे, असे डॉ. पांढरीपांडे म्हणाले. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. रत्नदीप देशमुख, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. कैलास पाथ्रीकर, डॉ. भारत हंडीबाग, डॉ. एस. एस. शेख, डॉ. अरुण खरात आदींनी डॉ. विद्यासागर यांचा सत्कार केला.