आरोपींच्या कोठडीसाठी गुन्हे शाखेने दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर मुंबई हायकोर्टात गुरुवारी सुनावणी झाली. डॉ. पायल तडवीवर कधीही जातीवाचक टिप्पणी केलेली नाही, तिला फक्त एकदा व्हॉट्स अॅपवर ‘भगौडी’ असे म्हटले होते, असा दावा आरोपींच्या वकिलांनी हायकोर्टात केला आहे. हायकोर्टाने आरोपींचा ताबा गुन्हे शाखेला देण्यास नकार दिला असून सुरूवातीलाच या प्रकरणाचा तपास योग्य अधिकाऱ्यांकडे का दिला नाही ?,असा सवाल हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे.

डॉ. तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघांना अटक केली. मात्र, गांभीर्य ओळखून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सत्र न्यायालयाने आरोपी डॉक्टरांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे गुन्हे शाखेला आरोपींकडे चौकशी करता आली नव्हती. याच मुद्यावर गुन्हे शाखेने मंगळवारी उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली.

हायकोर्टाने आरोपींचा ताबा गुन्हेशाखेकडे देण्यास नकार दिला. मात्र, गुन्हे शाखेला तुरुंगात जाऊन तिन्ही आरोपींची चौकशी करण्याची मुभा दिली आहे. शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी या तीन दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत गुन्हे शाखेला आरोपींची चौकशी करता येणार आहे. आरोपींच्या जामीन अर्जावर सोमवारी होणार आहे.

हायकोर्टात आरोपींच्यावतीनेही युक्तिवाद करण्यात आला. “पायल तडवीवर कधीही जातीवाचक किंवा वर्णद्वेषी टिप्पणी केली नव्हती. प्रसूतीगृहातील रुग्णांच्या रक्तदाबाची चुकीची नोंद केल्याबद्दल पायलला दम दिला होता. वारंवार तिच्याकडून ही चूक व्हायची. यावर पायल दरवेळी ‘मी थकले आहे’, असे सांगायची. यावरुन तिला एकदा व्हॉट्स अॅप ग्रुपवर ‘भगौडी’ म्हटले होते”, असे आरोपींच्यावतीने हायकोर्टात सांगण्यात आले.