12 December 2017

News Flash

डॉ. राजेंद्र धामणे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव

१ कोटी रुपये व सन्मानचिन्ह प्रदान; पुरस्काराची रक्कम संस्थेला अर्पण

प्रतिनिधी, नगर | Updated: June 10, 2016 1:56 AM

१ कोटी रुपये व सन्मानचिन्ह प्रदान; पुरस्काराची रक्कम संस्थेला अर्पण
रोटरी इंटरनॅशनल या संस्थेचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा ‘द वन इंटरनॅशनल हय़ुमॅनेट्रियन’ पुरस्कार नगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानचे संचालक डॉ. राजेंद्र धामणे यांना मिळाला आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख अमेरिकन दीड लाख डॉलर (सुमारे १ कोटी ५ लाख रुपये) असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. धामणे यांनी या पुरस्कारासह ही रक्कम संस्थेला अर्पण केली आहे.
धामणे दाम्पत्याचे कार्य ‘लोकसत्ता’च्या ‘सर्व कार्येषू सर्वदा’ या उपक्रमाद्वारे व्यापक स्तरावर महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचले. संस्थेच्या वतीने आता नगर तालुक्यातच मनगाव येथे बेवारस मनोरुग्ण महिलांसाठी तब्बल ६०० खाटांचा निवासी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यासाठी या पुरस्काराची सर्व रक्कम देण्याचे डॉ. धामणे यांनी जाहीर केले.
हाँगकाँग येथे मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात डॉ. धामणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष के. आर. रवींद्रन व पुरस्कार समितीचे प्रमुख डेव्हिड हरिलेला यांच्या हस्ते डॉ. धामणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा मूळ पुरस्कार १ लाख डॉलरचा होता. मात्र संस्थेने कार्यक्रमात त्यात वाढ करून डॉ. धामणे यांना दीड लाख डॉलरचा पुरस्कार प्रदान केला. मानवतावादी कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराच्या पहिल्या फेरीसाठी जगातील ११ जणांची निवड करण्यात आली होती. अंतिम फेरीत यातील चौघांचा समावेश करण्यात आला. या चौघांमधून या पुरस्कारासाठी अंतिमत: ‘दी वन’ म्हणून डॉ. धामणे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमातच डॉ. धामणे यांनी या रकमेसह हा पुरस्कार माउली सेवा प्रतिष्ठानच्या इंद्रधनू प्रकल्पातील महिला व मुलांना अर्पण केला. माउली सेवा प्रतिष्ठानच्या वतीने नगर तालुक्यातील शिंगवे येथे बेवारस मनोरुग्ण महिलांसाठी निवासी उपक्रम राबवला जातो. या महिलांना येथे दाखल करून त्यांची सर्व शुश्रूषा व या आजारातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. डॉ. राजेंद्र व डॉ. सुजाता धामणे या दाम्पत्याने या कार्याला वाहून घेतले असून, संस्थेत सध्या शंभरपेक्षाही अधिक बेवारस मनोरुग्ण महिला व काही महिलांची मुलेही आश्रयाला आहेत.

First Published on June 10, 2016 1:56 am

Web Title: dr rajendra dhamne of international glory
टॅग DR Rajendra Dhamne