राष्ट्रीय केळी कार्यशाळेत कृषी आयुक्त डॉ. एस. के. मल्होत्रा यांचे मत
काही वर्षांपूर्वी अत्यल्प असलेली केळीची लागवड मोठय़ा प्रमाणात वाढून ती शेतकऱ्यांनी अंगीकारण्यामागे जैन इरिगेशनचे योगदान मोठे आहे. यापुढे विदेशात केळी निर्यातीची जी संधी आहे, त्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय कृषी आयुक्त डॉ. एस. के. मल्होत्रा यांनी व्यक्त केले. कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया आणि जैन इरिगेशन यांच्या वतीने येथील जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय केळी निर्यात कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, डॉ. एच. पी. सिंग, अखिल भारतीय केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष भागवत पाटील, महाबनानाचे अध्यक्ष ज्ञानदेव महाजन आदी उपस्थित होते. सध्या भारतात सुमारे ३० मिलियन टन केळीचे उत्पादन होते. कमी क्षेत्राच्या मानाने जळगाव जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी भारतात सर्वाधिक उत्पादन घेऊन दाखविले असून याचे श्रेय शेतकऱ्यांसमवेत जैन इरिगेशनच्या कृषी शिक्षण विस्ताराला व उच्च कृषी तंत्रज्ञानाला द्यावे लागेल, असेही डॉ. मल्होत्रा यांनी सांगितले. निर्यातीसाठी गुणवत्तापूर्ण केळीचे उत्पादन उच्च कृषी तंत्रज्ञानाद्वारेच शक्य असून शेतकऱ्यांनी त्यासाठी अधिक कष्ट घेण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. केंद्र सरकारच्या अपेडा नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन व आपण सर्व मिळून यात निश्चित पुढाकार घेऊ असेही त्यांनी आश्वस्त केले. डॉ. एच. पी. सिंग यांनी १९७७-७८ मध्ये केळीचे दर हेक्टरी अवघे १३ क्विंटल उत्पादन होते. आजची उत्पादन क्षमता ही शेतकऱ्यांनी दर हेक्टरी ६५ टनापर्यंत नेऊन दाखविली असून ही क्रांती टिश्युकल्चरची केळी रोपे व ठिबकमुळे झाली असल्याचे सांगितले.
बाळाच्या संगोपनासारखे केळीचे संगोपन व काळजी घेतली तर जागतिक पातळीवर अव्वल दर्जाच्या केळीचे उत्पादन आपण सहज घेऊ असा विश्वास जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केला. भारतीय केळीची जगभर ओळख निर्माण व्हावी यासाठी जैन इरिगेशन थेट निर्यातीसाठीही आपला सहभाग घेईल असेही त्यांनी नमूद केले.