News Flash

शीतल आमटे यांचा मृत्यू आत्महत्या की अपघात?

वरोरा पोलिसांकडून तपास

वरोरा पोलिसांकडून तपास

चंद्रपूर : आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की आत्महत्येच्या प्रयत्नात तसा अपघात घडला, या दोन्ही बाजूंनी वरोरा पोलिसांकडून तपास केला जात आहे.

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, विरोधात गेलेल्या कुटुंबाला आत्महत्येचा इशारा देण्यासाठी म्हणून शीतल यांनी स्वत:ला इंजेक्शन टोचून घेतले. मात्र औषधाची मात्रा अधिक झाल्याने त्या बेशुद्ध पडल्या व त्यातच त्यांनी उलटी केली. उलटीद्वारे बाहेर पडलेले अन्नाचे कण श्वासनलिकेत अडकले आणि त्यांचे हृदय बंद पडले, असाही एक अंदाज आहे. विशेष म्हणजे, वरोरा पोलिसांनीही अपघाती मृत्यूचाच गुन्हा दाखल केला आहे.

शीतल यांच्या मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध स्वत: एमबीबीएस डॉक्टर असलेले वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे करीत आहेत. शीतल मृत्यू प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शीतल यांना आत्महत्या करायचीच नव्हती. कौटुंबिक वादात तिचे कायम पाठीराखे असलेले वडील डॉ. विकास आमटे यांनीही बोलणे बंद केल्याने त्यांना आत्महत्या करीत असल्याचे चित्र निर्माण करायचे होते. त्यातूनच त्यांनी इंजेक्शन घेतले, असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे.

पूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न

शीतल आमटे यांनी सहा महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे झोपेच्या गोळय़ा घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हा या प्रकरणाची तक्रार झाली होती. आताही जबाबात कुटुंबीयांनी याबाबत माहिती दिली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांनी दिली.

नागपुरातील बडय़ा औषध विक्रेत्याची चौकशी

या प्रकरणात बुधवारी एकूण पाच जणांचे जबाब नोंदवण्यात आले. यामध्ये शीतल यांना इंजेक्शन, औषध व गोळय़ांचा पुरवठा करीत असलेल्या नागपुरातील एका बडय़ा औषध विक्रेत्याचा समावेश आहे. तसेच आनंदवन रुग्णालयात ही औषधे घेऊन येणारी व्यक्ती, वरोरा येथील एक अस्थिरोगतज्ज्ञ व शीतल यांच्या घरी काम करणाऱ्या दोन व्यक्तींचीही चौकशी करण्यात आली.

आम्ही अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्या की अपघात, या दोन्ही दृष्टिकोनांतून तपास सुरू आहे. लवकरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. शवविच्छेदनाचा अहवाल आला असला तरी, रक्ताचे नमुने, फॉरेन्सिक अहवाल व इतर गोष्टींची पडताळणी सुरू आहे. मृत्यूपूर्वी शीतल यांनी मोबाइल, लॅपटॉप, टॅपमध्ये काही संग्रहित केले आहे काय, याचाही शोध आम्ही घेत आहोत. या सर्व वस्तू मुंबई येथे पाठवण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

– डॉ. नीलेश पांडे, वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 1:17 am

Web Title: dr sheetal amte suicide investigation by warora police zws 70
Next Stories
1 बीड जिल्ह्य़ात आणखी एका शेतकऱ्यावर बिबटय़ाचा हल्ला
2 सर्वेक्षणाचा घाट अंगलट
3 रोख रकमेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक
Just Now!
X