शीतल यांच्या सासू-सासऱ्यांचा आमटे कुटुंबीयांना सवाल

चंद्रपूर : आमटे कुटुंबीयांना मुक्या प्राण्यांची भाषा कळते, तर मग स्वत:च्या मुलीचे दु:ख कसे कळले नाही?, असा सवाल शीतल आमटे यांचे सासु-सासरे शिरीष व सुहासिनी करजगी यांनी आमटे कुटुंबीयांना केला आहे. समाजमाध्यमावर एक पत्र सार्वजनिक करून त्यांनी शीतलच्या आत्महत्येबाबत अप्रत्यक्षपणे आमटे कुटुंबीयांनाच जबाबदार धरले आहे.

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
maval lok sabha mahayuti marathi news, shrirang barne latest news in marathi
श्रीरंग बारणे यांच्या अडचणी वाढल्या, चिंचवडमधून भाजपाचा विरोध कायम
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

करजगी यांनी आमटे कुटुंबीयांना लिहिलेल्या या पत्रात ते म्हणतात, शीतल हिला मानसिक त्रास होता, तर तिला अशा अवस्थेत जवळ घेण्याऐवजी दूर का लोटले? ‘आमटे’ असून तिच्या बाबतीत जर असा अन्याय होत असेल तर बाकी सामान्य मुलींचे काय होत असेल?

गौतम व शीतलच्या लग्नापासून आम्ही तिचा स्वत:च्या मुलीसारखा सांभाळ करीत होतो. मात्र तिच्या कुटुंबीयांकडून तिला दिला गेलेला त्रास सहन न झाल्यामुळेच तिने स्वत:ला संपवले आहे. आमटे कुटुंबीयांनी स्वस्वाक्षरीने सार्वजनिक केलेल्या पत्रात शीतलच्या मानसिक आजाराबद्दल लिहिले आहे. यासंदर्भातील वृत्त वृत्तपत्रात आम्हाला वाचायला मिळाले. त्याचे वाईट वाटले व आश्चर्य देखील. यावर प्रतिक्रिया द्यावी की गप्प रहावे हे कळत नव्हते.

शीतल व गौतम यांनी आनंदवनात उभारलेले काम एकदा सर्वानी जाऊन बघावे, असे खुले आवाहन त्यांनी केले आहे. शीतल नैराश्यात असताना तिचे आईवडील डॉ. विकास व डॉ. भारती आमटे तिला एकटीला सोडून हेमलकसा येथे का गेले, आमटे कुटुंबातील सर्व सदस्य मिळून शीतल व गौतमच्या विरुद्ध कटकारस्थान तर रचत नाहीत ना, अशी शंकाही या पत्रात उपस्थित करण्यात आली आहे. तसेच डॉ. विकास व डॉ. प्रकाश आमटे यांच्याबद्दल हे सर्व लिहिण्याची वेळ यावी हे दुर्भाग्य आहे. शीतल हिला कुठलाही मानसिक त्रास नव्हता. जबरदस्तीने हा त्रास तिच्या आईवडिलांकडून लादला गेला, हे तिचे दुर्भाग्य आहे, असेही शेवटी या पत्रात म्हटले आहे.

मोबाइल आणि लॅपटॉप मुंबईला पाठविणार

शीतल यांचे दोन मोबाइल, लॅपटॉप व टॅब आज नागपूर येथील न्यायवैद्ययक प्रयोगशाळेने ताब्यात घेतले होते. मात्र मोबाइल व लॅपटॉपचे लॉक उघडता आले नाही आहे. त्यामुळे ते मुंबई येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. मोबाइलमधीलचित्रफिती, संदेश पुन्हा मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

करजगी यांचे प्रश्न

’ आमटे कुटुंबाने तिच्याबद्दल असे संयुक्त निवेदन स्वाक्षरी करून द्यावे, यासारखी लाजिरवाणी गोष्ट आणखी काय असू शकते?

’ शीतलने संस्थेच्या कामात खूप योगदान दिले असे तुम्हीच म्हणता, मग ती नैराश्यात असताना तिला आपुलकीने जवळ न घेता दूर का लोटले गेले? आनंदवनात सगळय़ा कुष्ठरोग्यांची काळजी घेतली जाते. मग सख्ख्या मुलीबाबत असा बोभाटा का? यामागे आमटे कुटुंबाचा काही स्वार्थ आहे का?

’  कौस्तुभ आमटे यांना विश्वस्त मंडळावर घेतले. पण, त्याला काढलेच कशाला होते? ज्या विश्वस्तांनी त्याला काढले त्यांनीच त्याला का परत घेतले? त्याला काढण्यामागचे कारण काय होते?

’ चार ते पाच वर्षांपासून कौस्तुभचे नाव कुठेच नव्हते. तो इतके वष्रे कुठे होता? की आमटे कुटुंबही मुलगा मुलगीमध्ये फरक करतात, असा प्रश्नही शीतल यांच्या सासू-सासऱ्यांनी या पत्रात उपस्थित केला आहे.

आमटे-करजगी कुटुंबीयांचे जबाब

शीतल आमटे मृत्यू प्रकरणाचा तपास आत्महत्येच्या दिशेने सुरू आहे. त्यांच्या खोलीतील  सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल, संगणक, लॅपटॉपची तपासणी सुरू आहे. लवकरच सत्य माहिती समोर येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे रात्री उशिरापर्यंत आमटे व करजगी कुटुंबीयांचे जबाब नोंदवले. शीतल यांच्या आत्महत्येबाबत संभ्रमाची स्थिती अजूनही कायम आहे. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगितले.