परळी येथील डॉ. सुदाम मुंडे व डॉ. सरस्वती मुंडे या दाम्पत्याला गर्भलिंग निदान व सदोष मनुष्यवधाच्या आठ गुन्ह्यांत परळीतील न्यायालयाने सोमवारी प्रत्येकी सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर प्रत्येक गुन्ह्यामध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाच्या निकालानुसार या दाम्पत्याला एकूण ४८ महिने शिक्षा आणि प्रत्येकी ८० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील भोपा येथील विजयमाला महादेव पटेकर यांचा गर्भपात करताना मृत्यू झाल्यानंतर गर्भलिंग निदान चाचणीतून परळी येथे कसे कुकर्म सुरू होते, याची माहिती उजेडात आली. पटेकरच्या मृत्यू प्रकरणात परळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव पाटीबा गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. सुदाम मुंडेवर गुन्हा दाखल झाला. गर्भलिंग चाचणी करून हे दाम्पत्य स्त्री अर्भकाचा गर्भपात करत असे. तसेच ते अर्भक प्लास्टिक पिशवीत भरून स्वमालकीच्या शेतात व पडक्या विहिरीत टाकत होते. या प्रकरणी १८ जून २०११ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता.