‘राष्ट्रवादीला गाडून टाका’ असे जाहीर वक्तव्य मित्रपक्षाच्याच आमदाराकडून होत असेल तर ‘आघाडीचा धर्म’ हाच का, असा प्रश्न उपस्थित झाला असून आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या भूमिकेची पक्षश्रेष्ठी दखल घेणार काय? अशी भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे कान टोचले जाणार काय? या बाबत येथे मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची जाहीर सभा उद्या (गुरूवारी) स्टेडियम मदानावर होत असून, सभेला बोर्डीकर उपस्थित राहणार काय, असाही प्रश्न चर्चिला जात आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे व जिंतूरचे आमदार बोर्डीकर यांच्यातील वैमनस्य सर्वश्रुत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत बोर्डीकर यांच्याविरुद्ध भांबळे यांनी अपक्ष म्हणून लढत दिली होती. या निवडणुकीत बोर्डीकरांचा निसटता विजय झाला असला, तरीही गेल्या १० वर्षांपासून दोघांमध्ये असलेले राजकीय वैर आता टोकाला गेले आहे. बोर्डीकरांनी जिंतूर व सेलू तालुक्यांतील आपल्या सर्व कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार बोर्डीकरांचे कार्यकत्रे शिवसेनेच्या कामालाही लागले आहेत. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भांबळे यांनी ज्या पद्धतीने आघाडीचा धर्म पाळला, त्याच पद्धतीने आम्हीही आघाडीचा धर्म पाळू, असे बोर्डीकर यांनी म्हटले आहे.
मध्यंतरी बोर्डीकर व भांबळे यांच्यात काही समेट घडू शकतो काय, असा प्रयत्न झाला. परभणीच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोर्डीकरांकडे मदतीचा हात मागितला होता. माणसाच्या हातून चुका घडू शकतात, तुम्ही चुका दुरुस्त केल्या तर आम्हीसुद्धा आमच्या पद्धतीने चांगली भूमिका पार पाडू, असेही पवार म्हणाले होते. मात्र, बोर्डीकरांवर या आवाहनाचा कोणताही परिणाम झाला नाही. चार दिवसांपूर्वी जिंतूर येथे झालेल्या एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोर्डीकरांनी उघडपणे भांबळे यांच्याविरोधात वक्तव्य करून कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीला गाडून टाकण्याचा कानमंत्र दिला! आतापर्यंत बोर्डीकरांनी भांबळेंच्या विरोधात व्यासपीठावरून जाहीर भूमिका घेतली नव्हती; पण आता मात्र घेतली आहे. एकीकडे आघाडी धर्माची भाषा केली जात असताना दुसरीकडे बोर्डीकरांनी मात्र भांबळे यांच्याविरुद्ध तीव्र प्रचारमोहीम उघडली आहे.
बोर्डीकरांच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघातच सेलू येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भांबळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली होती. या सभेलाही बोर्डीकर गैरहजर राहिले. एवढेच नाही, तर गारपिटीची पाहणी करण्यास आलेल्या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या दौऱ्यात ते सहभागी झाले; पण तासाभराने पवारांच्याच उपस्थितीत झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त बठकीला त्यांची गरहजेरी होती. आता बोर्डीकरांनी थेट राष्ट्रवादीलाच गाडण्याची भाषा सुरू केल्याने उद्या होणाऱ्या दोन्ही काँग्रेसच्या संयुक्त जाहीर सभेत या भूमिकेचे काय पडसाद उमटणार, याची उत्सुकता आहे. भांबळे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या सभेला बोर्डीकर उपस्थित राहणार काय? सभेनिमित्त बोर्डीकरांचे कान टोचण्याचा प्रयत्न होणार काय? याची जिल्ह्यात मोठी उत्सुकता तयार झाली आहे.
एकीकडे ‘आघाडीचा धर्म’ पाळण्याच्या आणाभाका घेतल्या जात असताना, परभणी लोकसभा मतदारसंघात मात्र आघाडीच्या धर्मालाच सुरूंग लावला जात आहे. बोर्डीकरांचा अपवाद वगळता जिल्हाभर काँग्रेस प्रचारात उतरली असली, तरी बोर्डीकरांच्या भूमिकेने मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या एकत्रित निवडणुका लढविण्याच्या भूमिकेलाच छेद दिला जात आहे.