|| राहुल खळदकर

लोकप्रिय परदेशी फळाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

आरोग्यास पूरक परदेशी फळ म्हणून सध्या देशातील शहरगावांतील बाजारात आढळणाऱ्या ‘ड्रॅगन फ्रूट’च्या मागणीत वाढ होत असल्याने महाराष्ट्रातील शेतक ऱ्यांनी या फळाच्या लागवडीवर भर दिला आहे. सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्य़ांमध्ये त्याचे उत्पादन काढण्यात येत असून या फळाकडे राज्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून पाहत आहेत.

उष्ण कटिबंधीय प्रदेशात ड्रॅगन फ्रूट येते. अमेरिका, इस्त्रायल, थायलंड, मलेशिया, श्रीलंका, बांगलादेशातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर ड्रॅगनची लागवड करतात. ड्रॅगनची चव साधारपणे किवी फळासारखी असते. तीन ते चार वर्षांपासून भारतातील बाजारपेठांमध्ये परदेशातून ड्रॅगनफ्रूट येत आहेत. रक्तातील पेशी कमी झाल्यानंतर ड्रॅगनचे सेवन केल्यास पेशी वाढतात, असा दावा करण्यात येतो.  या दाव्याला कोणताही आधार नाही. वैद्यकीय व्यावसायिकांनीही तसे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. तरीही ड्रॅगन फ्रूट हळूहळू भारतीय लोकांमध्ये लोकप्रिय बनले आहे. ड्रॅगन फ्रूटच्या मागणीत गेल्या काही वर्षांपासून वाढ होत असल्याचे निरीक्षण श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील ड्रॅगन फळाचे व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी नोंदवले.

यंदा राज्यासह भारतात उत्पादन होणाऱ्या ड्रॅगन फ्रूटचा  हंगाम सुरू झाला असून पुणे मार्केटयार्डातील फळबाजारात सध्या दररोज आठ ते दहा हजार किलो ड्रॅगनची आवक होत आहे. मुंबई-ठाणे-नाशिकसह राज्यभरातील सर्वच प्रमुख शहरगावांमध्ये ड्रॅगनफ्रूट उपलब्ध होत आहे. पुण्यातील बाजारातून मुंबई तसेच राज्यातील विविध शहरात ड्रॅगन विक्रीसाठी पाठविण्यात येतात. गोवा तसेच गुजरात मधूनही ड्रॅगनला मागणी असल्याचे सुपेकर यांनी सांगितले. ड्रॅगनची लागवड महाराष्ट्रासह गुजरातमधील शेतक रीही करू लागले आहेत.

नगर जिल्ह्य़ातील पाणी जायकवाडीत वळविण्यात आल्यानंतर गेल्या तीन, चार वर्षांपासून ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यास सुरुवात केली. आम्ही अडीच एकरावर ड्रॅगनची लागवड केली असून यंदा या उत्पादनाचे आमचे तिसरे वर्ष आहे. सुरुवातीची दोन वर्ष एकरी उत्पादन कमी मिळते. यंदा आम्हाला एकरी पाच ते सहा टन उत्पादन मिळाले आहे. ड्रॅगनच्या लागवडीसाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केला आहे. ड्रॅगनची झाडे निवडुंगाच्या झाडाप्रमाणे असतात. आता आम्ही ड्रॅगनकडे नगदी फळ म्हणून बघतो. – सदाशिव सोपानराव वल्टे, दहेगाव (बोलका), ता. कोपरगाव, जि. अहमदनगर

राज्यातील लागवड..

सातारा जिल्ह्य़ातील फलटण, सोलापूर जिल्ह्य़ातील पंढरपूर, अहमदनगर जिल्ह्य़ातील कोपरगाव, तसेच गुजरातमधील शेतक ऱ्यांनी ड्रॅगनची लागवड सुरू केली आहे. ड्रॅगन हे फळ  लाल आणि पांढ ऱ्या रंगात उपलब्ध असून लाल रंगाच्या ड्रॅगनला मोठी मागणी आहे. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत ड्रॅगनची आवक फळबाजारात होते. लाल रंगाच्या ड्रॅगनला वाढती मागणी असून लाल ड्रॅगनला प्रतवारीनुसार ५० ते १५० रुपये प्रतिकिलो असा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे.