जनावरांच्या आरोग्याला धोका पोहाचण्याची भीती

वसई : वसई- विरार शहरात काही ठिकाणच्या भागात गटारांतील सांडपाण्यावर भाजीपाला पिकविला जात असल्याचा प्रकार समोर आला होता.  त्याच पाठोपाठ आता गुरांना लागणार चारा ही गटारातील सांडपाण्यावर उगविला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा चारा जनावरांच्या आरोग्याला हानीकारक ठरू शकतो.

वसई पश्चिमेतील कृष्णाटाऊनशीप जवळून  सांडपाणी वाहून नेणारा नाला गेला आहे. या  नाल्या शेजारीच असलेल्या मोकळ्या जागेत नाल्यातील सांडपाणी वापरून चारा उगविण्याचे काम केले जाऊ लागले आहे. हाच चारा तयार झाल्यानंतर त्याची कापणी करून जनावरांना खाद्य म्हणून  नेला जाऊ लागला आहे. या दरुगधीयुक्त पाण्यावर तयार झालेला जनावरांना दिला जात असल्याने जनावरांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची भीती प्राणी प्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

नाले व खाडीत शहराचे मलमूत्र, सांडपाणी सोडले जात असून हे पाणी अत्यंत प्रदूषित व दुर्गंधीयुक्त आहे.  हे प्रदूषित सांडपाणी घातक आहे.उन्हाळ्यात येथील गवत इतक्याला सुकून गेले असते परंतु  याच घातक असलेल्या सांडपाण्यावर हे गवत पुनर्जीवित केले जात आहे.यासाठी याभागात नाल्याशेजारी जागोजागी मोटार लावून पाणी सोडण्याचे काम सुरू असल्याचे चित्र दिसून आले आहे.

तर नंतर याच चाऱ्याचे भारे बांधून सायकल व टेम्पो याद्वारे वाहतूक केली जात आहे. गटारांच्या दूषित पाण्यावर महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या डोळ्यांदेखत हा प्रकार घडत असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या प्रकाराला वेळीच आवर न घातल्यास शहरातील जनावरांच्या आरोग्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात असे प्राणीप्रेमींनी सांगितले आहे.

वसई पश्चिमेतील भागातून नाल्यातून घाणीचे पाणी वापरून  चारा तयार केला जात आहे. हाच चारा नंतर वाहनांमध्ये भरून जनावरांसाठी नेला जातो, यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. पालिकेने याकडे लक्ष देऊन हा गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी.

— सागर पाटील, सामाजिक कार्यकर्ते