अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती मुंबई शाखेकडून विविध शाखांच्या चांगल्या उपक्रमाची अंशत: किंवा पूर्ण जबाबदारी स्वीकारली जाईल, अशी ग्वाही परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली आहे. सध्या मध्यवर्ती शाखेच्या कार्यकारिणीकडून राज्यातील विविध शाखांचे सर्वेक्षण सुरू असून काही आक्षेपार्ह आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
येथील महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत जोशी यांनी ही माहिती दिली. या वेळी परिषदेचे कार्यवाह दीपक करंजीकर, नाशिक शाखेचे अध्यक्ष नेताजी भोईर, कार्यवाह सुनील ढगे, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यकारिणीचे सतीश लटके यांच्याकडून राज्यातील विविध शाखांच्या कामकाजाचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. या माध्यमातून प्रत्येक शाखेच्या अडचणी काय आहेत, त्यांचे विविध प्रश्न, त्यांचे उपक्रम याची माहिती घेण्याची सुरुवात झाली असल्याचे जोशी यांनी नमूद केले. परिषदेच्या कामकाजात जर कोणी चालढकल करत असेल तर त्याला पदावरून बडतर्फ करून योग्य व्यक्तीला संधी देण्यात येईल, असा इशाराही जोशी यांनी दिला. करंजीकर यांनी शाखेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली.
सांस्कृतिक संचालनालयाशी सध्या चर्चा सुरू असून, राज्यातील विविध थिएटर्सचा खर्च सरकार करेल, परंतु शाखेची कार्यकारिणी त्यांच्यावर लक्ष ठेवेल. संगीत नाटकासंदर्भात मुंबईत १४ जून रोजी देवल स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात राज्यातील २१ शाखा सहभागी होणार असून, यामध्ये गडचिरोलीतील झाडेपट्टी शाखेचाही समावेश आहे. संगीत नाटकांमध्ये स्थानिक लोककलांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे. सरकारसोबत समन्वय साधून रंगकर्मीचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शाखेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून मुंबईतील प्रत्येक रुग्णालयातील दोन खाटा या रंगकर्मीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. नाशिक येथेही या संदर्भात पुढाकार घेण्याची अपेक्षा करंजीकर यांनी व्यक्त केली.
मध्यवर्ती शाखेच्या वतीने सुसज्ज, अद्ययावत असे ग्रंथालय लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे करंजीकर यांनी सांगितले. नाशिक येथे एकांकिका महोत्सवासारखे कार्यक्रम वर्षभर राबविण्यासाठी नाशिक कार्यकारिणीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करंजीकर यांनी केले. या वेळी मोहन जोशी यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी दत्ता भट व बाबुराव सावंत यांच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले.