शहरातील रेल्वे स्थानकातून १६ जून २०१९ रोजी पाच वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करणाऱ्याचे रेखाचित्र सीसीटीव्हीतील चित्रीकरणाच्या आधारे रेल्वे पोलिसांनी तयार केले असून घटनेच्या वर्षभरानंतर ते रेखाचित्र प्रसिध्द करण्यात आले आहे.
जयपूर येथे जाण्यासाठी गाडीच्या प्रतिक्षेत येथील रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक तीनवर थांबलेल्या कुटुंबियातील पाच वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करण्यात आले होते. पालकांना झोप लागल्याने हा प्रकार घडला.
बालिकेस घेवून जाणारा संशयित रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाला होता. संशयित मुलीला घेऊन गोवा एक्सप्रेसमध्ये बसून फरार झाला होता. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.
अपहरण केलेली मुलगी पाच वर्षांंची आहे. तिची उंची दोन फुट तीन इंच आहे.
रंग गोरा, नाक सरळ, मध्यम बांधा, डोळे आणि केस छोटे आहेत. अपहरणाच्या घटनेस वर्ष झाल्यानंतर आता कुठे अपहरणकर्त्यांचे छायाचित्र आणि रेखाचित्र प्रसिध्द करण्यात आले आहे. संशयित ३५ ते ४० वयोगटातील आहे. त्याची उंची पाच ते सहा फुट आहे. रंग सावळा, मध्यम बांधा, नाक सरळ, डोळे मोठे आणि केस छोटे आहेत.
चिमुकली अथवा संशयित याबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास त्यांनी ०२५७-२२२१७९० आणि ९८२३०१९७११, ७०२१५०२३५५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेतर्फे करण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2020 12:16 am