हर्षद कशाळकर, अलिबाग

अलिबाग, वरसोली, थळ, नवगाव या परिसरांत सुक्या मच्छीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. सोडे, अंबाडी, वाकटी, पाकट, जवळा, बोंबिल, माखली, खारा बांगडा यांसारख्या सुक्या मच्छीचा यात समावेश असतो. पावसाळ्यात ओले मासे मिळत नाहीत. त्यामुळे मांसाहारी लोक सुक्या मासळीची बेगमी करून ठेवतात. अलिबाग कोळीवाडय़ातील तेजस पाटील सुक्या मासळीचा व्यवसाय करतात. एरवी वर्षांला काही लाख रुपयांचे उत्पन्न देणारा हा व्यवसाय. मात्र टाळेबंदीमुळे गेली दोन महिने त्यांच्या व्यवसायाची चाके रुतली आहेत. बाजारपेठा बंद असल्याने सुक्या मासळीचा बाजार उठला आहे. टाळेबंदीमुळे या व्यवसायाचे कंबरडेच मोडल्याचे तेजस सांगतात.

पावसाळ्याचे चार महिने कोकण किनारपट्टीवर मासेमारी बंद असते. त्यामुळे मच्छीमार घरीच बसून असतात. सप्टेंबरनंतर मासेमारीला सुरुवात होते. मार्चपर्यंत ताज्या आणि ओल्या माशांचाच हंगाम असतो. मार्चनंतर मासे सुकविण्याचे काम सुरू होते. एरवी ओली मच्छी बाजारात विकण्यासाठी धडपडणारा मच्छीमार तितक्याच तळमळीने सुक्या मासळीसाठी मेहनत घेत असतो. पावसाळ्यातील तीन महिने आर्थिक चणचण जाणवू नये यासाठी त्यांची ही धडपड असते. पण नेमके हे महत्त्वाचे दोन महिनेच मासेमारी बंद ठेवण्याची वेळ आली.

मार्च महिन्याच्या उत्तरार्धात मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. मच्छीमार धास्तावले. बाजार बंद होत गेले. शासनाने टाळेबंदी जाहीर केली. त्यानंतरच्या पहिल्या दोन टप्प्यांत मासेमारी बंदच होती. तिसऱ्या टप्प्यात ती काही प्रमाणात सुरू होऊ लागली. पण मालवाहतूक सुविधा तितक्या प्रमाणात सुरू झाली नसल्याने सुकी मासळी विक्रीसाठी पाठवणे शक्य होत नव्हते. टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात मासेमारी सुरू झाली.

पण नेमक्या याच वेळी परराज्यांतील मजुरांसाठी गाडय़ा सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला. बोटींवर काम    करणारे खलाशी आणि तांडेल गावाकडे परतले आहेत. हे खलाशी प्रामुख्याने ओरिसा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील असतात. त्यामुळे बोटींवर काम करायला खलाशीच उपलब्ध नाहीत. शासनाने मच्छीमारांचे झालेले नुकसान भरून निघावे यासाठी यंदा १५ जूनपर्यंत मासेमारी करण्यास मुभा दिली आहे. पण खलाशीच उपलब्ध नसल्याने मासेमारी करणे शक्य नाही.

त्यामुळे टाळेबंदीमुळे झालेले नुकसान भरून काढणे कठीण जाणार आहे. दुसरीकडे सुक्या मासळीला बाजारात अपेक्षित उठाव नाही. त्यामुळे भाव पडण्यास सुरुवात झाली आहे. संकट आली की चहूबाजूने येतात असे म्हणतात. त्याचा अनुभव आज येत असल्याचे तेजस सांगतो. निसर्गाशी दोन हात करण्याची कला आम्हाला अवगत आहे, पण करोनाच्या आपत्तीला सामोर कसे जावे याचे उत्तर मिळत नसल्याचेही तेजस सांगतो.