अनेक अधिकाऱ्यांकडून एकाच व्यक्तीला अनेक वाहनचालक परवाने जरी करण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी वाहनचालक परवान्यांचा (ड्रायव्हिंग लायसन्स) डेटाबेस सरकार तयार करत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली. देशात किमान २२ लाख चालकांचा तुटवडा आहे आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी कुशल मनुष्यबळ उभारण्यात येत असून, चालकरहित मोटारींना परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही गडकरी म्हणाले.

कुठल्याही व्यक्तीला एकाहून अधिक परवाने जारी होण्यास आळा घालण्यासाठी सरकार चालक परवान्यांचा डेटाबेस तयार करत आहे. सध्या भारतात परवाना मिळवणे फारच सोपे असून, निरनिराळ्या राज्यांनी जारी केलेले अनेक परवाने एकाच व्यक्तीजवळ असण्याचे प्रकार घडले आहेत, असे रस्ते वाहतूक व महामार्ग खात्याचे मंत्री असलेले गडकरी यांनी सांगितले.

चाचणी न घेता परवाने जारी केल्यामुळे फार मोठय़ा संख्येत अपघात होतात. त्यामुळे अशा प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार वाहनचालकांसाठी अनेक प्रशिक्षण केंद्रे उभारत असल्याची माहिती गडकरी यांनी एका कार्यक्रमात दिली. चालकरहित मोटारींमुळे युवकांच्या रोजगारांवर गदा येईल. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत देशात अशा मोटारींना परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही ते म्हणाले.