न आलेले डोपलर, सीमाशुल्क विभागात अडकलेली रसायने, निरभ्र आकाश यामुळे निर्माण झालेले निराशाजनक वातावरण मंगळवारी दूर सारत औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांत झालेल्या पावसामुळे आशा पल्लवीत झाल्या. दुसरीकडे मराठवाडय़ात घेण्यात आलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगालाही मंगळवारीच सुरूवात करण्यात आली. दुपारी १ वाजून १० मिनिटांनी रसायने घेऊन उड्डाण केलेल्या विमानाच्या फवारणीत काही ठिकाणी तुरळक पाऊस पडल्याचा दावा केला जात आहे. या प्रयोगामुळे किती पाऊस नोंदविला गेला, हे मात्र उद्याच (बुधवारी) समजू शकेल. हवामान विभागानेही येत्या २४ तासांत मराठवाडय़ात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र, मंगळवारी उस्मानाबाद, बीड आणि लातूर या तीनही जिल्ह्य़ांत पाऊस झाला नाही.
सीमाशुल्क विभागात अडकलेले फ्लेअर्स सकाळी औरंगाबादला पोहोचले, तेव्हा वातावरणही चांगले ढगाळ होते. सकाळी नऊच्या सुमारास पावसाची भुरभुर सुरू झाली. दिवसभर ती सुरू होती. पण सरीवर सर असा मोठा पाऊस काही झाला नाही. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसाचे सर्वत्र कौतुक होते.
सकाळी दहाच्या सुमारास औरंगाबाद विमानतळावर फ्लेअर्स लावलेले विमान तयार होते. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंग विमानतळावर गेले होते. इतर उड्डाणे व पर्जन्यरोपण करणारे विमान यांच्या वेळा निश्चित केल्यानंतर दुपारी १ वाजून १० मिनिटांनी उडालेल्या विमानाने १०० किलोमीटरची फेरी करीत २० फ्लेअर्सचा मारा ढगांमध्ये केला. हा प्रयोग यशस्वी झाला की नाही हे तातडीने सांगता येणार नाही. मात्र, आजचा दिवस कृत्रिम पावसासाठी सकारात्मक होता, असे आपत्ती व्यवस्थापन आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितले. पर्जन्य रोपण मोहिमेत रडारतज्ज्ञ डॉ. रोनाल्ड ई. राईनहार्ट, आर्गोस्वामी ए कांबळी, शहेजाद मिस्त्री, टॉड शूल्झ, ब्योन पेडर्सन, विवेकानंद बलिजेपल्ली, आर. जी. शर्मा यांचा समावेश आहे.
ना ‘रिमझिम’, ना ‘रिपरिप’  
वार्ताहर, परभणी
पावसाळा सुरू होऊनही कालपर्यंत उन्हाळ्याचाच अनुभव येत होता; पण मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणाने आभाळाचा रंग बदलला आणि पावसाला सुरुवात झाली. दिवसभर भूरभूर पाऊस चालू होता. मात्र, या पावसात कोणताही जोर, तसेच रिमझिम अशी संततधारही नव्हती. परंतु तरीही या पावसाने सगळीकडे ओल निर्माण केली. रस्ते भिजले, दिवसभर भूरभूर चालू होती, तरीही कुठेच पाणी साचलेले दिसले नाही. दरम्यान, जिल्ह्यात आजवर या हंगामात केवळ १०५ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्याच्या वार्षकि सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण अवघे साडेतेरा टक्के आहे. त्यामुळे भविष्यात चिंतेचे वातावरण आहे.
पावसाळ्यातील सर्व नक्षत्रे कोरडी जात असताना आणि भर पावसाळ्यात उन्हाळ्यातील दाह दिसून येत असताना कालपासून अचानक वातावरण बदलले. काल दिवसभर आकाश ढगाळ होते. मात्र, पावसाचा थेंब पडला नाही. मंगळवारी दिवसभर आकाशात ढग होते, त्यामुळे सूर्यदर्शन घडले नाही. दिवसभर मात्र पावसाची भूरभूर सुरू होती. ज्याला ‘रिपरिप’ वा रिमझिमसुद्धा म्हणता येणार नाही, असा हा पाऊस दिवसभर अधूनमधून चालू होता. विशेष म्हणजे हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असल्याच्या बातम्या आहेत. केवळ अंग ओले करण्यापुरताच हा पाऊस असून या पावसाने कुठेही पाणी साचलेले दिसले नाही.
सोमवारी रात्रीपर्यंत जिल्ह्याच्या पावसाची एकूण सरासरी १०५.८२ मिमी आहे. जिल्ह्याच्या वार्षकि सरासरीच्या तुलनेत हा पाऊस केवळ १३.६६ टक्के आहे. जिल्ह्याची वार्षकि सरासरी ७७४.१९ असून कालपर्यंत किमान ३८२.२ पाऊस अपेक्षित होता. म्हणजे किमान निम्मा पाऊस जिल्ह्यात बरसणे अपेक्षित होते, तरीही या सरासरीच्या तुलनेत पाऊस अत्यल्प असल्याने चिंता व्यक्त होत आहे. सध्या पावसाने सुरुवात केली असली, तरीही कालपर्यंत जिल्ह्यात तालुकानिहाय झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे : परभणी ९३.८३, पालम १३५.३३, पूर्णा १३९.४८, गंगाखेड ९१.७५, सोनपेठ ६७, सेलू १२७.४४, पाथरी ७५.६६, जिंतूर ८७.०७, मानवत १३५.०२. सकाळपासून जिल्ह्यात चालू झालेला पाऊस दमदार नसला, तरीही त्याने केलेली सुरुवात आशादायी मानली जात आहे. किमान या दोन दिवसांत पावसाळी वातावरण तयार झाले. ही सुद्धा नावीन्यपूर्ण बाब मानली जात आहे. अन्यथा पावसाळ्यातही लोकांना उन्हाळ्याचाच अनुभव येत होता. सध्या सुरू झालेल्या पावसाने संततधार चालू ठेवावी, अशी अपेक्षा सर्वचजण व्यक्त करीत आहेत.

महिन्याचा रुसवा सोडत
पावसाची रिमझिम हजेरी
वार्ताहर, िहगोली
जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात दमदार पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या पेरण्या आटोपल्या. मात्र, तेव्हापासून गायब झालेल्या पावसाने मंगळवारी रिमझिम स्वरुपात हजेरी लावली. शेतकरी मोठय़ा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
पावसाने ताण दिल्यामुळे जिल्ह्य़ातील ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पावसाने आता हजेरी लावली असली, तरी दुबार पेरणीची शक्यता मात्र मावळली आहे. मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाल्याने ३ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु गेल्या महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, तर चांगल्या जमिनीवरील पिकाची वाढ खुंटली. एकूण नसíगक स्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. मंगळवारी हलक्या स्वरुपात पावसाला प्रारंभ झाला. दुपारी तीनपर्यंत जिल्हाभर रिमझिम पाऊस पडू लागला.
जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात पीकविमा भरण्यास सुरुवात केली होती. सुमारे २८ हजार शेतकऱ्यांनी पीकविम्याची रक्कम भरली. सरकारने ७ ऑगस्टपर्यंत पीकविम्याची रक्कम भरण्यास मुदतवाढ दिली. मात्र, त्यात मेख मारली. दि. १ ऑगस्टनंतर दुबारपेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळेल, ही अट नुकसानकारक ठरणारी असल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे. सरकारने दुबार पेरणीसाठी १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना विमा भरता येणार असल्याचा निर्णय जाहीर केला. सोमवापर्यंत जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली होती. मंगळवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आता केवळ दोन दिवसांत दुबार पेरणी करण्याचा विचार केला, तरी पेरणीसाठी वातावरण अनुकूल नसल्यामुळे ७ ऑगस्टपर्यंत ती पूर्ण होणार नाही.