दुष्काळाची राज्यात सर्वाधिक झळ बसलेल्या जालना जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला, तो मृग नक्षत्र सुरू होण्याच्या बरोबर एक महिना आधीचा! राज्यात सर्वाधिक कमी पाऊस होण्याबरोबरच भयावह दुष्काळाचे वास्तव सप्टेंबरपासूनच जाणवू लागले होते. नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवडय़ात केंद्रीय पथक दुष्काळाच्या पाहणीस येऊन गेले होते. जालना जिल्ह्य़ातील खरीप पैसेवारी ५०पेक्षा कमी जाहीर झाली आणि केंद्रीय दुष्काळी पथकाने भेट दिल्यानंतरही पाच-साडेपाच महिने मुख्यमंत्र्यांना जालना दौऱ्यावर येण्याची आवश्यकता भासली नाही. त्यासाठी त्यांनी मुहूर्त निवडला तो थेट जायकवाडीवरून राबविलेल्या जालना शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा!
दोन अब्ज ४ कोटी खर्चाच्या या योजनेचे श्रेय घेण्यावरून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्पर्धा या दौऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत दिसली. दुष्काळी स्थितीमुळे या योजनेच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत पुष्पहारांऐवजी स्थानिक उर्दू कवींची पुस्तके देऊन करण्यात आले. परंतु कार्यक्रम संपताना या योजनेसाठी पाठपुरावा व प्रयत्न केल्याबद्दल स्थानिक काँग्रेस आमदार कैलास गोरंटय़ाल यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे व्यासपीठावर असलेले राष्ट्रवादीचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी २००५-२००६ मध्ये आपण नगरविकास राज्यमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मदतीने ही योजना कशी मंजूर करवून आणली, याचा तपशील दिला. एवढेच नव्हे, तर अलीकडच्या काळात या योजनेसाठी राज्य सरकारने निधी द्यावा, असा आग्रह धरल्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत शिव्या खाल्ल्या, असेही ते बोलून गेले. या योजनेसाठी आपण केलेले प्रयत्न टोपे कथन करीत असताना दुसरीकडे शामियान्यात त्यांच्यासमोर ‘जलसम्राट आमदार कैलास गोरंटय़ाल’ अशी अक्षरे टी शर्टवर रंगविलेले अनेक युवक बसले होते.
मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी स्थितीला अनुसरून भाषण करताना जालना जिल्ह्य़ातील उपाययोजनांचा तपशील दिला व नवीन योजनेचे पाणी शहरात आले, हा सुवर्णक्षरांनी लिहिला जाणारा इतिहास असेल, असे सांगितले. उपमुख्यमंत्री पवार यांनी मात्र जालना शहराची ही योजना विलंबाने होत असल्याबद्दल सरळ दिलगिरी व्यक्त करून टाकली! पाणी नसतानाही संयम ठेवणाऱ्या व सहनशील जनतेला लाख-लाख धन्यवाद दिले पाहिजेत, असेही ते म्हणाले. या योजनेसाठी निधी मिळावा, यासाठी आग्रह धरणाऱ्या टोपे व गोरंटय़ाल यांना आपण अनेकदा फटकारले, याची आठवणही त्यांनी सांगितली.
जालना नगरपालिकेने पूर्ण केलेल्या या योजनेच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजकपद साहजिकच पालिकेकडे होते. परंतु या संपूर्ण कार्यक्रमात नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांचे अस्तित्व कोठेच जाणवले नाही. अनेक नगरसेवक कुठे बसावे या विवंचनेत होते, तर काही व्यासपीठावर पोहोचण्यासाठी पोलीस यंत्रणेशी हुज्जत घालत होते. प्रमुख पाहुण्यांच्या यादीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशिवाय दहा मंत्र्यांची नावे असली, तरी त्यापैकी आठ अनुपस्थित होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव यादीत होते. पण ते उपस्थित नव्हते. प्रमुख पाहुण्यांच्या यादीमधील २ खासदार व ९ पैकी ४ आमदार कार्यक्रमाकडे फिरकलेच नाहीत.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या दौऱ्यात रोजगार हमी किंवा चारा छावणी आदी ठिकाणी भेटी अथवा दुष्काळग्रस्तांशी चर्चा वगैरे कार्यक्रमांऐवजी जाफराबाद येथील पूर्ण झालेल्या तात्पुरत्या पाणीयोजनेची पाहणी करून जालना पाणीयोजनेचे उद्घाटन केले. एका तलावातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्षाच्या मेळाव्यास हजेरी लावली. जिल्ह्य़ातील नाले खोल व सरळ करणे आणि बंधारे बांधण्यासाठी आठ कोटींचा निधी त्यांनी जाहीर केला.
आमदार गोरंटय़ाल यांनी जालना पाणीयोजनेसाठी वेळोवेळी महत्त्वाची भूमिका होती, असे मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या जिल्हा मेळाव्यात सांगितले. परतूरचे अपक्ष आमदार सुरेश जेथलिया हेही उपस्थित होते. परतूरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन जेथलिया काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या उशिराने का होईना झालेल्या दुष्काळी दौऱ्यात अशा प्रकारे पक्षवाढीचा कार्यक्रमही होऊन गेला. गोरंटय़ाल यांना मंत्रिमंडळात घेण्याची मागणी जालना शहराध्यक्ष अब्दुल हफीज यांनी, तर अब्दुल हफीज यांना विधान परिषदेच्या जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी देण्याची मागणी नगराध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी दौरा आणि पक्षीय राजकारण रणरणत्या उन्हात सुरू असताना जालना पाणीयोजनेच्या श्रेयाचा विषयही चर्चेत होताच. सत्ताधारी लोकप्रतिनिधी व विरोधक यांच्यात हे श्रेय घेण्यावरून दावे करण्यात येत असून ही योजना नेमकी कोणामुळे झाली, असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आल्यावर ‘मंत्रिमंडळामुळे योजना झाली’ असे मुख्यमंत्र्यांचे उत्तर होते.