पावसाच्या दडीमुळे पिके धोक्यात

अमरावती : गेल्या दोन महिन्यांतील समाधानकारक पावसानंतर यंदा खरीप हंगामात चांगले उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच पश्चिम विदर्भात पावसाने ओढ दिल्याने पिके कोमेजण्यास सुरुवात झाली आहे. बुलढाणा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्य़ांत पावसाची तूट २० ते २८ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. ही कोरडय़ा दुष्काळाची चाहूल मानली जात आहे.

पश्चिम विदर्भात खरीप पिकाखालील सरासरी क्षेत्र ३२.३१ लाख हेक्टर असून जवळपास ९७ टक्के क्षेत्रात पेरणी झाली. यंदा दुबार-तिबार पेरणीचे संकट फारसे ओढवले नाही. विभागात सर्वाधिक १४ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबिनचा पेरा झाला आहे. ९ लाख ७० हजार हेक्टरमध्ये कपाशीची लागवड करण्यात आली आहे. ४ लाख ४३ हजार हेक्टरमध्ये तूर, ८६ हजार हेक्टरमध्ये मूग आणि ६४ हजार  हेक्टरमध्ये उडिदाची लागवड झाली. विभागात तूर पीकवाढीच्या, मूग आणि उडीदाचे पीक शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत असून बहुतांश ठिकाणी काढणी सुरू झाली आहे. सोयाबिन शेंगा धरणे आणि शेंगा पक्वतेच्या अवस्थेत आहे. या स्थितीत पावसाची नितांत गरज असते. पण पावसाने हुलकावणी दिल्याने अनेक भागांत सोयाबिन कोमेजू लागले आहे. सोयाबिन पिवळे पडत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे. कपाशीचे पीक बोंडे धरण्याच्या अवस्थेत असताना पावसाअभावी उत्पादकतेवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. उभी पिके उन्हामुळे करपू लागली आहेत. पावसाच्या या लहरीपणाचा कोरडवाहू क्षेत्रात मोठा विपरीत परिणाम जाणवणार आहे. विभागात गेल्या महिन्यात सुरुवातीला सात ते आठ दिवस चांगला पाऊस झाला, पण २२ ऑगस्टपासून पावसाचा पत्ता नाही. पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांमध्ये अशीच स्थिती आहे. बुलढाणा जिल्ह्य़ात गेल्या १ जूनपासून आतापर्यंत ६१० मि.मी. (सरासरीच्या ७२ टक्के), अकोला जिल्ह्यात ५१० मि.मी. (१०२ टक्के), वाशीम जिल्ह्यात ५५५ मि.मी. (१०८ टक्के), अमरावती जिल्ह्यात ४९६ मि.मी. (७५ टक्के) तर यवतमाळ जिल्ह्य़ात ५४० मि.मी. म्हणजे सरासरीच्या केवळ ८१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण विभागात ८७ टक्केच पाऊस झाला आहे. यवतमाळ जिल्ह्य़ातील यवतमाळ, कळंब, अमरावती जिल्ह्य़ातील मोर्शी, वरुड, चिखलदरा, बुलढाणा जिल्ह्य़ातील खामगाव, संग्रामपूर या तालुक्यांमध्ये तर ५० ते ६० टक्केच पाऊस झाला आहे.

त्यातच पावसाच्या उघडिपीने खरिपावर संकट ओढवले आहे. पाण्याअभावी जमिनीला भेगा पडल्या असून उन्हाच्या चटक्याने पिकेही सुकू लागली आहेत. ऐन दाणे भरण्याच्या कालावधीत पावसाने दिला खंड हा उत्पादकतेवर विपरीत परिणाम करणार, अशी भीती आहे. आता पावसाचे काही दिवसच शिल्लक असून मोठय़ा पावसासाठी शेतकऱ्यांचे आकाशाकडे डोळे लागले आहेत. सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा प्रवाह मंदावल्याने राज्यात सर्वत्र पाऊस थांबला, पण त्याचा मोठा फटका हा अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ या तीन जिल्ह्य़ांना बसला आहे. सध्या कुठेही पाऊस नसल्याने आणि त्यातच दिवसाच्या तापमानात मोठी वाढ झाल्याने आजवर जमिनीत टिकून असलेला ओलावा झपाटय़ाने कमी होत आहे. याचा परिणाम खरिपातील सोयाबिन, कापूस, तूर आणि ज्वारी या पिकांवर होऊ लागला आहे. बऱ्याच ठिकाणी सोयाबिनचे पीक पिवळे पडणे, शेंगांमध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया संथगतीने होणे, कपाशीमध्ये फूल, पाती गळ यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. फळबागांनाही पाण्याची नितांत गरज असून संत्र्याच्या बागांना पावसाच्या या ओढीचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. अशातच वीज भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये भर टाकली आहे. ग्रामीण भागात वीज रोहित्रांचे प्रश्न गंभीर आहेत. शेतकऱ्यांना आपली पिके वाचवणे कठीण होऊन बसले आहे. पण, कोरडवाहू शेतकऱ्यांना तर निसर्गकृपेवर विसंबून राहावे लागणार आहे.

विभागातील नऊ मोठय़ा धरणांमध्ये आतापर्यंत केवळ ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. विभागातील सर्वात मोठय़ा अप्पर वर्धा धरणाच्या मध्य प्रदेशातील पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने जलपातळी वाढली नाही. गेल्या वर्षी या कालावधीत अप्पर वर्धा प्रकल्पात ६२ टक्के पाणीसाठा होता. यंदा १७ सप्टेंबर अखेर जलसाठा ४७ टक्क्यांवर स्थिरावला आहे. एकूण २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ६९.२५ टक्के तर ४६६ लघू प्रकल्पांमध्ये ६१.५३ टक्के पाणीसाठा झाला आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठा न झाल्यास पिण्याच्या पाण्यापासून ते सिंचनापर्यंत मर्यादा येऊ शकतात, अशी भीती आहे.

कीड-रोगांचा प्रादुर्भाव

पुरेसा पाऊस न आल्याने खरीप हंगाम वाया जाण्याच्या बेतात असताना कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा तर सोयाबीनवर चक्रीभुंगा आणि खोडकिडीचा, हुमणी व उंट अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. मूग आणि उडीद पिकांवर काही ठिकाणी करपा रोग व मावाकिडीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला आहे.