साडेतीन लाख लोक टँकरवर, तर पन्नास हजार जनावरे छावण्यांमध्ये
कृष्णा-वारणा नदीचा काठ सोडला तर अर्धा सांगली जिल्हा दुष्काळाच्या वणव्यात होरपळत आहे. जिल्हय़ातील तीन लाख पन्नास हजार जनता टँकरच्या तुटपुंज्या पाण्यावर तहान भागवत असताना ५० हजारांहून अधिक जनावरे छावण्यांच्या आश्रयाखाली जीवन कंठीत आहेत. प्रशासन मात्र कागदोपत्री आकडेवारीत गुंतले असून, दुष्काळाची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्नशील दिसत नाही. राजकीय पातळीवर श्रेय लाटण्याचे प्रयत्न मात्र जोरदारपणे सुरू आहेत.
सांगली जिल्हय़ात १९७२पेक्षा भीषण दुष्काळी परिस्थिती या वेळी निर्माण झाली आहे. जिल्ह्य़ातील सरासरी पर्जन्यमान ४८० मिलिमीटर असतानाही जत, आटपाडी तालुक्यात गेल्या तीन वर्षांतला पाऊसही सरासरी गाठू शकला नाही. पावसाच्या अनियमिततेने शेतीचे अर्थशास्त्र तर बदलले आहेच, पण त्याचबरोबर या भागांतील लोकांची मानसिकताही बदलत चालली आहे. शेतीचे उत्पन्न केवळ शून्यावरच नव्हे तर वजाबाकीत चालल्याने सालबिजमीचा शब्दप्रयोगच इतिहासजमा होत चालला आहे.
मिरज तालुक्याच्या पूर्वभागात असणारी ४४ गावे, कवठेमहांकाळ तालुक्यातील ६०, जत तालुक्यातील १२३, तासगाव ६९, खानापूर ६६, आटपाडी ६०, पलुस ६, कडेगाव ५६ आणि वाळव्यातील १ अशी ७३४ गावांपकी ४८५ गावे टंचाईग्रस्त आहेत. या गावांतील ३ लाख ४८ हजार ७०१ जनसंख्या आजच्या घडीला टँकरच्या पाण्यावर आपली मूलभूत गरज भागवत आहेत. टँकरचे पाणी वेळेत मिळेल याची खात्री नाही. मग पिण्यालायक आहे की नाही, हा प्रश्न विचारणाराच मूर्खाच्या नंदनवनातील मुसाफीर ठरावा, अशी परिस्थिती आहे.
माणसाच्या पिण्याच्या पाण्यासाठी रोजचा संघर्ष चालू असताना काळय़ा आईच्या जिवावर जोपासलेली जित्रापे दुष्काळाच्या वणव्यात जगवायची कशी ही समस्या गेल्या पाच वर्षांपासून पाठी लागली आहे. शेपाचशे रुपयाला मिळणारा कडबा शेकडय़ाला दोन-अडीच हजार मोजले तरी मिळेनासा झाला आहे.
मायबाप सरकारने दुष्काळातील जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या आहेत. जत तालुक्यात बनाळी, िशगणापूर, वाळेिखडी, अंत्राळ, कुडणूर, लोहगाव, आवंढी, येळवी, जिरग्याळ, आंकले, बसर्गी, बाज आदी ठिकाणी छावण्या सुरू केल्या असून या ठिकाणी ४ हजार ३६ जनावरे आहेत. आटपाडी तालुक्यात िभगेवाडी, कवठुळी, शेटफळे, तडवळे, बनपुरी, िनबवडे, करगणी, घरनिकी, तळेवाडी, आटपाडी, माडगुळे, बालेवाडी, आंबेवाडी यप्पावाडी, विभूतवाडी, भाळेवाडी, हिवतड, दिघंची, िपपरीबुद्रुक, जांबुळणी, आवळाई, घाणंद या ठिकाणी ३० हजार ३७२ जनावरे मिळेल तो चारा पोटआगीला खात आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एस, रांजणी, घाटनांद्रे, कोकळे, कुची, आगळगाव, इरळी आणी नांगोळे येथे ६२७३ जनावरे छावणीच्या आश्रयाला आली आहेत. खानापूर-विटा तालुक्यात भिकवडी बुद्रुक आणि रेवणगाव येथील छावण्यात १४२५ जनावरे आहेत.
जिल्हय़ात विविध ठिकाणी ४६ छावण्यांमधून ४२ हजार १०६ जनावरे दिवस कंठत आहेत. या ठिकाणी केवळ ऊस किंवा वाडे, वाळके गवत वजनावर मोजून दिले जात आहे. ओला चारा मिळणे ही जनावरांच्या दृष्टीने मेजवानी ठरते आहे. जनावरांची उसाबर करण्यासाठी, चारा मिळवण्यासाठी घरचा कर्ता एखादा माणूस छावणीवरच मुक्कामाला राहणे भाग पडते आहे. काहींनी तर छावणीतच जनावरांसोबत आपला संसार थाटला आहे.
जनावराच्या चाऱ्याची, पिण्याच्या पाण्याची भीषणता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज चालू असणारा हातपंप भूगर्भातील पाणी संपल्याने कधी बंद पडेल याची शाश्वती नाही.
प्रशासनाकडून सूर असणारे प्रयत्न तोकडे पडत आहेत. १२-१२ कोसावर टँकरच्या पाण्याशिवाय पाणी मिळणार नाही, अशी परिस्थिती माणगंगेच्या खोऱ्यात निर्माण झाली आहे