09 March 2021

News Flash

पश्चिम महाराष्ट्रावर ओल्या दुष्काळाचे संकट

आधीच जोरदार पाऊस झाला असताना सोमवारपासून पावसाने आणखी जोर धरला आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| दयानंद लिपारे

आधीच जोरदार पाऊस झाला असताना सोमवारपासून पावसाने आणखी जोर धरला आहे. यामुळे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि रानोमाळ पाणीच पाणी झाले आहे. दोन-अडीच महिने धो-धो बरसणाऱ्या संततधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या सुमारे १६ तालुक्यांत ओल्या दुष्काळाचे संकट उद्भवले आहे. ऊस, भात, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांना धोका निर्माण झाला असून पीक हातून गेल्याचे दु:ख बळीराजाच्या चेहऱ्यावर दाटले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीला जोर धरला असताना कृषी विभागाने पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निकषाबाबत एकवाक्यता नसल्याने नवा वाद निर्माण होत आहे. हा विषय राजकीय वादाला खतपाणी घालण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

कोल्हापुरावर पावसाची नेहमीच कृपा राहिली आहे. कोल्हापूरच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात पाऊस लक्षधारांनी कोसळत असतो. आसपासच्या हिरव्या डोंगराईत पावसाच्या खुणा सर्वदूर दिसत असतात. कोल्हापुराच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भागात (पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गाचा पश्चिम भाग) पावसाचा वर्षांव दरवर्षी मुबलक असतो. यंदा तर पावसाचा मुक्काम अंमळ अधिक आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून अपवाद वगळता रोजच कोठे ना कोठे, काही ना काही पाऊस पडल्याचे शासकीय आकडेच सांगतात. काळेभोर ढग, पावसाची हजेरी यामुळे सूर्यदर्शन दुर्मीळ झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भूदरगड, आजरा, कागल, चंदगड, शाहूवाडी, गडहिंग्लज असे १०, सांगली जिल्ह्य़ातील शिराळा आणि सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, सातारा, महाबळेश्वर, वाई या पाच तालुक्यांतून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींकडून होत आहे.

संततधार

पावसाळ्यातील चार महिने पश्चिम महाराष्ट्रात पावसाची हजेरी असते. या वर्षीही तेच चित्र असले तरी यंदा जाणवणारा लक्षणीय बदल म्हणजे पावसाची नित्याची हजेरी. जूनच्या मध्यापासून जवळपास रोजच पाऊस पडल्याचे वृत्त आहे. पावसाचे रोजचे बरसणे सुरुवातीला आनंददायी ठरले होते, पण आता ते अनंत अडचणीचे कारण बनले आहे. सततच्या  पावसाचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना त्रासदायक ठरू लागले आहेत. अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली आहेत. ढगाळ हवामान, सततचा पाऊस यामुळे पाने कुजली आहेत. शेत पिकांची वाढ खुंटली आहेत. पावसाने धुमाकूळ घातल्याने खात्रीच्या ऊस पिकासह भात, सोयाबीन , नाचणी, भुईमूग पिके धोक्यात आली आहेत. पावसाने शेतातील ओलावा कायम आहे. त्यामुळे शेतात जाऊन काही काम करायचे म्हटले तरी ते शक्य होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. पिकांना रोगराईने ग्रासले आहे. उसावर करपा, तांबेरा, हुमणीचा प्रादुर्भाव वाढला आहे. सूर्यदर्शन नसल्याने एकीकडे उसाच्या वाढीला मर्यादा आल्या आहेत तर दुसरीकडे शेतातील ओल, पाणी कमी होण्याचे नाव घेत नाही. उसाचा गोडवा दिसण्याऐवजी आतापासूनच त्याचा कडवटपणा दिसत आहे. नदीकाठच्या बुडीत क्षेत्राची परिस्थिती तर आणखीनच गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे दिसत आहे.

निकषाचा वाद

यंदा पावसाची संततदार कायम आहे, हे वास्तव लोकप्रतिनिधीपासून ते शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्व जण मान्य करत आहेत. मात्र अद्याप शासकीय यंत्रणा ओला दुष्काळ असल्याचे कबूल करत नाहीत. त्यातच ओल्या दुष्काळाचे परिपूर्ण निकष नसल्याचे कोल्हापूर आपत्ती निवारण कक्षाचे म्हणणे आहे. याबाबतीत कृषी विभाग महसूल विभागाकडे बोट दाखवत आहे. हा विभाग उत्तर देण्याऐवजी थेट पंचनामा करण्यासाठी बाहेर पडला आहे. पंचनाम्याची आकडेवारी उपलब्ध झाल्यावर ओल्या दुष्काळावर बोलता येईल, असा शासकीय यंत्रणेचा दृष्टिकोन आहे. पावसाचा मुक्काम कायम असल्याने ऊस, सोयाबीनचे नुकसान झाल्याचे कृषी सहसंचालक कार्यालयातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील यांनी लोकसत्ताला सांगितले. महसूल, कृषी, जिल्हा परिषद यांनी एकत्रित पिकांच्या नुकसानीचा पंचनामा सुरू केला असल्याचे जिल्हा अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे यांनी स्पष्ट केले. शेतकरी, लोकप्रतिनिधी यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला असला तरी शासन याला अद्यप तयार  नसल्याने या मुद्दय़ावरून वाद अटळ आहे. निवडणुका तोंडावर असल्याने विरोधकांना सत्ताधाऱ्यांविरोधात रान उठवण्यास आणखी एक नामी संधी मिळाली असल्याने राजकारणाचा फड पेटण्याची चिन्हे आहेत.

आकडय़ांचा घोळ

पावसाचा मुक्काम कायम असला तरी कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या माऊसक सरासरीच्या प्रमाणात मात्र तो कमी असल्याचे आकडेवारीकडे नजर टाकल्यास दिसून येते. कोल्हापूर जिल्ह्य़ाची पावसाची एकूण सरासरी १७७२ मिलीमीटर इतकी आहे. यंदा पावसाचा एक महिना शिल्लक असला तरी आजवर १४३२ मिमी पाऊस पडला आहे. जुलैची सरासरी  ७५७ मिमी असून पडलेला पाऊस ७३८ मिमी आहे. जूनची सरासरी ३३७ मिमी असून २९० मिमी पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिना संपण्यास ५ दिवस उरले असले तरी ४७७ मिमी सरासरीच्या तुलनेत ३९३ मिमी पाऊस पडला आहे, असे कोल्हापूर आपत्ती निवारण कक्षाचे प्रमुख प्रसाद संकपाळ यांनी सांगितले. या आकडेवारीचे विश्लेषण करता पहिल्या तिन्ही महिन्यांत  सरासरीपेक्षा पाऊस कमीच असल्याचे दिसते.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

गेल्या तीन महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्य़ात यंदा जास्त पाऊस झाला आहे. शेती उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. ‘उसासह बहुतांश पिकांचे ५० टक्केहून अधिक नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ातील बहुतांशी तालुक्याच्या परिस्थितीची राज्य सरकारने तातडीने दखल घेऊन जिल्ह्य़ात ओला दुष्काळ जाहीर करावा,’ अशी मागणी  खासदार धनंजय महाडिक यांनी महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. पाटील यांनी तातडीने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार यांना जिल्ह्य़ातील शेती नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाला पाठवावा, असे आदेश दिले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांच्या लोकसभा मतदारसंघातील पन्हाळा, शाहूवाडी, शिराळा या तीन तालुक्यांत ओला दुष्काळाचे सावट गहन-गडद होत असल्याने त्यांनीही बळीराजाला दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने मदत करावी, अशी मागणी केली आहे. या आस्मानी संकटाची राज्य सरकारने तातडीने दखल घ्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा आंदोलन छेडू असा इशाराच काही आमदारांनी दिला असल्याने पावसाच्या फटक्याचे गांभीर्य ठळकपणे जाणवू लागले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 1:08 am

Web Title: drought in maharashtra 2
Next Stories
1 शासकीय यंत्रणेचा ढिसाळ कारभार, नगरसेवकांचा हलगर्जीपणा जबाबदार
2 १० हजारांहून अधिक सदस्यांचे पद धोक्यात!
3 कोल्हापूरमध्ये राजकीय हादरा!
Just Now!
X