|| आसाराम लोमटे

मराठवाडय़ात सर्वाधिक सिंचनक्षेत्र असलेला जिल्हा अशी कागदावर नोंद असणाऱ्या परभणी जिल्ह्य़ावर यंदा दुष्काळाची भीषण छाया आहे. गोदावरी नदीवर झालेल्या बंधाऱ्यांमुळे उन्हाळ्यातही दिसणारे पाणी केव्हाच आटले. तेथे वाळूमाफियांच्या उच्छादामुळे मोठे-मोठे खड्डे झाले आहेत. गोदाकाठची गावे तहानली असून किमान एक लाख मजुरांनी रोजगारासाठी स्थलांतर केले असावे, असा अंदाज आहे.

आटलेले जलसाठे, ओस पडलेली गावे, चारा छावण्यांअभावी जनावरांवर आलेली उपासमारीची वेळ अशा दुष्काळाच्या भयाण संकटावर मात करताना प्रशासनाचे अपयश पदोपदी जाणवत आहे. दर वर्षी या दिवसांत परतीच्या वाटेवर असणाऱ्या ऊसतोड मजुरांना गावात काम नाही, रोहयोची तुरळक कामे मजुरांचे समाधान करू शकत नाहीत. ऊसतोडीसाठी गेलेले मजूर गावी परतले आणि त्यांनी पुन्हा मुंबई, नाशिक, पुणे या शहरांची वाट धरली. जिंतूर तालुक्यातील वझर, वाघी धानोरा, सावंगी, म्हाळसा या परिसरातल्या बहुतांश तांडय़ांवरील मजूर रोजगारासाठी बाहेर पडल्याने सध्या तांडय़ांवर वृद्धांशिवाय कोणीही दिसत नाही. जोगीतांडा, विजयनगर तांडा, अंबरवाडी तांडा, आवलगाव तांडा असे किती तरी तांडे आता रिकामे झाले आहेत. एकटय़ा जिंतूर तालुक्यातून स्थलांतरित मजुरांची संख्या ४० हजारांवर आहे. हीच परिस्थिती गंगाखेड तालुक्यातील डोंगराळ टापूतली आहे. कधी नव्हे ते गोदाकाठची गावेही या वेळी पाण्यासाठी व्याकूळ आहेत. गंगाखेड तालुक्यात गोदावरी तांडा, उमरा नाईक तांडा, खंडाळी या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असला तरी प्रत्यक्षात टँकरची गरज असणारी गावे अजून मोठय़ा प्रमाणात आहेत. सेलू, सोनपेठ, पूर्णा, पालम या तालुक्यांतील काही गावांमध्ये टँकर सुरू आहेत. जिल्ह्य़ात १८० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दुष्काळाने उग्र रूप धारण केले असताना प्रशासनाच्या लेखी केवळ ४७ हजार नागरिकांची तहान टँकरवर अवलंबून आहे.

एकीकडे दुष्काळाची दाहकता वाढत असतानाच गोदावरी, दुधना या नदीकाठावरील गावे वाळूमाफियांच्या उच्छादाने हैराण आहेत. नदीत पाण्याचा थेंब नाही, पण वाळू उपशाने मोठे-मोठे खड्डे झाले आहेत. गाढवांवरून वाळूची वाहतूक करण्यापर्यंत या जिल्ह्य़ात मजल गेली होती. या दोन्ही मोठय़ा नद्यांच्या काठावर असणारी गावे आज पाण्यासाठी आसुसलेली आहेत. गोदावरीच्या पात्रात असलेले ढालेगाव, मुळी, मुदगल या ठिकाणचे बंधारे कोरडेठाक आहेत. जिल्ह्य़ातल्या २४ पकी १३ तलावांमध्ये मृतपाणीसाठा आहे. येलदरीने तर केव्हाच तळ गाठला, आता लोअर दुधनामध्ये केवळ काही गावे व शहरांचा पाणीपुरवठा करण्याइतकेच पाणी आहे. गंगाखेड तालुक्यातील डोंगर पिंपळा, भेंडेवाडी, दगडवाडी या गावांमध्ये टंचाईने उग्र रूप धारण केले आहे.

जिल्ह्य़ात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कागदोपत्री चाऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी एका आकडेवारीनुसार जिल्ह्य़ात खरीप, रब्बी हंगामातून मिळणारा चारा, जंगल- वन व पडीक जमिनीतून  मिळणारा चारा आणि वैरण विकास योजनेपासून उपलब्ध होणारा चारा असा एकूण पाच लाख ९० मेट्रिक टन चारा उपलब्ध होईल, असा अंदाज पशुसंवर्धन विभागाने वर्तवला होता. प्रत्यक्षात खरीप, रब्बी हंगाम यंदा शेतकऱ्यांच्या हातचे निघून गेल्यानंतर पशुसंवर्धन विभागाला हे शहाणपण सुचावे हेसुद्धा आश्चर्यच. सध्या कडब्याचे भाव आभाळाला भिडले आहेत, गुरांचा सांभाळ करणे शक्य होत नसल्याने कवडीमोलाने हे पशुधन विक्रीसाठी बाजारात आले आहे. सध्या जिल्ह्य़ातील सर्वच गुरांचे आठवडी बाजार गुरांच्या गर्दीने फुलून आले आहेत. याच दोन महिन्यांपूर्वीच्या नियोजनात जिंतूर तालुक्यातल्या आडगाव, चारठाणा या मंडळात चारा छावणी सुरू करण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात या ठिकाणी तर चारा छावणी सुरूझाली नाहीच, पण आता जिल्ह्य़ातल्या अनेक मंडळांत चारा छावण्या सुरू करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अजून जिल्ह्य़ात एकही चारा छावणी सुरू झालेली नाही, हे विशेष.

पाण्याचे दुíभक्ष, गुरांच्या चाऱ्याचा तुटवडा, खरीप आणि रब्बीच्या धुळधाणीनंतर शेतीचा कोसळलेला डोलारा, मजुरांचे स्थलांतर, दावणीतल्या गुरांचे जाणवणारे ओझे अशा अनेक कारणांमुळे यंदाचा दुष्काळ अनेकांच्या आयुष्यावर उठला आहे.

तांडे रिकामे..  ऊसतोड मजूर या दिवसांमध्ये आपल्या गावी परततात. मात्र यंदा दुष्काळामुळे गावात मजुरी नसल्याने त्यांचे तांडेच्या तांडे आसपासच्या शहरगावांमध्ये स्थलांतर करीत आहेत. एका तालुक्यातून ४० हजार मजूर या काळात स्थलांतरित झाले आहेत. बहुतांश गावांतील तांडय़ांची हीच स्थिती असल्याने तेथे केवळ वृद्ध माणसे शिल्लक राहिली आहेत.

नाकर्ते प्रशासन..

दुष्काळावरील प्रशासनाच्या उपाययोजना तोकडय़ा पडत आहेत. दुष्काळाच्या भीषणतेचा अंदाज अजूनही प्रशासनाला आला नाही अन्यथा जिल्ह्य़ात रोहयोच्या कामांची जी दयनीय स्थिती आहे ती झाली नसती. कामांअभावीच जिल्ह्य़ातील हजारो मजुरांचे स्थलांतर झालेले असताना अजूनही प्रशासन गंभीर नाही.