|| प्रबोध देशपांडे

कृषी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत संशोधन, शिक्षण, विस्तारासह विविध वाण-तंत्रज्ञानाची निर्मिती

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?

विदर्भातील शेतकरी आधुनिक संशोधनातून संपन्न होण्यासाठी अकोल्यात कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. कृषी विद्यापीठाने गेल्या ४९ वर्षांत संशोधन, शिक्षण, विस्तारासह विविध वाण व तंत्रज्ञानाची निर्मिती केली. यशाचा आलेख चढत असतानाच विद्यापीठासमोरील आव्हानांचा डोंगरही वाढत गेला. अनेक वेळा त्यावर मात करण्यात यश आले, तर काही वेळा परिस्थितीपुढे हतबल झालेले विद्यापीठही शेतकऱ्यांनी अनुभवले. विदर्भात गत दोन दशकातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या समस्येने जगाचे लक्ष वेधले. या गंभीर समस्येवर अद्यापही उपाय सापडला नाही. वैदर्भीय शेती शाश्वत आणि शेतकरी समृद्ध करण्याचे खरे आव्हान डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासमोर आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षांत वाटचाल करणाऱ्या कृषी विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना मोठय़ा अपेक्षा आहेत.

विदर्भातील कृषी विद्यापीठाच्या स्थापनेपुर्वीची वाटचाल खडतर होती. हे विद्यापीठ विदर्भाबाहेर पळवण्याच्या प्रयत्नाला जनतेकडून कडाडून विरोध झाला. आंदोलकांनी विदर्भात हरित क्रांतीचे स्वप्न साकारण्यासाठी लढा दिला. या आंदोलनात एकूण आठ जण शहीद झाले. या बलिदानातून २० ऑक्टोबर १९६९ ला डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. कृषी विद्यापीठाचा ४९ वर्षांचा कार्यकाळ पाहिला असता, शेतकरीभिमुख कार्य झाल्याचे दिसून येते. कृषी शिक्षण, संशोधन, कृषी विस्तार आणि बीजोत्पादन आदींमध्ये विद्यापीठाचे उल्लेखनीय कार्य केले. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र विदर्भातील ११ जिल्हय़ांचे आहे. पश्चिम आणि पूर्व विदर्भातील शेती व परिस्थिती वेगवेगळी. हवामान, भौगोलिक, जमीन, पीक पद्धती, पाणी यामध्ये प्रचंड तफावत दिसून येते. दोन्ही भागांतील शेतकऱ्यांच्या हिताचे संशोधन करण्याची मोठी जबाबदारी कृषी विद्यापीठावर आहे.

गत दोन-तीन दशकांपासून विदर्भातील शेतकरी विविध संकटांच्या मालिकेत अकडला आहे. हलक्या प्रतीचा भूभाग, पाणी साठवणूक, सिंचनाचा अभाव तसेच इतर संकटांनी विदर्भातील शेतकरी होरपळून निघत आहे. अमरावती विभागातील खारपाणपट्टय़ाचीही निसर्गनिर्मित मोठी समस्या आहेच. सततची नापिकी, कर्जबारीपणा, शेतमालाला न मिळणारा भाव यासह विविध कारणांमुळे बळीराजा आत्महत्येचा सारखा टोकाचा मार्ग अवलंबून लागला. हा प्रश्न सर्वच पातळ्यांवर चिंतेचा विषय झाला. राज्यकर्त्यांनीही शेतकऱ्यांची अवस्था पाहून पॅकेज व कर्जमाफी दिली. शेतकरी आत्महत्यांच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी विद्यापीठानेही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, शेतकरी आत्महत्या रोखण्यात अद्यापही यश आले नाही, हे दुर्दैवी वास्तव आहे. शेतकरी व शेतकऱ्यांभोवती असलेले सर्व घटक, त्यांच्या समस्या, मानसिकता याचा चौकटी बाहेर जाऊन अभ्यास करण्याची नितांत गरज आहे. केवळ कागदोपत्री उपाय करून शेतकरी आत्महत्यासारख्या गंभीर समस्येवर उपाय गवसणार नाहीत.

कालानुरूप व बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी पीक पद्धतीमध्येही सुधारणा करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी जास्त उत्पादन देणारे कमी खर्चाचे वाण विकसित करण्याची आवश्यकता दिसून येते. पर्जन्याचे अवलोकन करून नेमकी कोणती पिके घ्यावी व त्याची पद्धती यावर विद्यापीठाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. शेतकरी संशोधक वृत्तीचा असतो. मात्र, त्याला कुठे तरी मर्यादा येतात. ते पारंपरिक शेतीवर भर देतांना दिसून येतात. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्र आत्मसात करण्यासाठी विद्यापीठाने त्यांना प्रोत्साहित करणेही अपेक्षित आहे. यासाठी विद्यापीठाकडून वर्षभर घेण्यात येणारे अनेक उपक्रम केवळ औपचारिकता न राहिता शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त ठरण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज दिसून येते. कोटय़वधी रुपयांचा खर्च करून कृषी विद्यापीठात विविध संशोधने केली जातात. शासनाला शिफारस करून ही संशोधने चौकटी पुरते मर्यादित राहतात. काही अपवाद वगळता व्यावहारिक पातळीवर त्याचा उपयोग होताना दिसत नाही. संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत नाही, असा आरोप करून कृषी विद्यापीठे पांढरा हत्ती असल्याची टीका वारंवार होते. याचा गांभीर्याने विचार होण्याचीही गरज आहे. कपाशीवर गेल्या हंगामात बोंड अळीचे आक्रमण झाले. पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्यासोबतच कीटकनाशकांच्या अविवेकी वापरामुळे विषबाधा होऊन अनेक शेतकऱ्यांचे बळी गेले. यावर कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सखोल अभ्यास करून उपाययोजनांवर काम केले. चालू हंगामात सुरुवातीपासूनच खबरदारी घेतली. कमी खर्चाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात मोठे यश आले. फेरोमोन ट्रॅप, ट्रायकोडर्मा, ट्रायकोकार्ड, एकात्मिक कीड व्यवस्थापन यांसारख्या साध्या उपायांमधून बोंड अळीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता आले. विषमुक्त शेतीसाठी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन व राज्यातील सेंद्रिय शेतीचे धोरण हे कृषी विद्यापीठाचीच देण ठरले आहे. ही विद्यापीठाची मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.

३४ हजार पदवीधारक

विद्यापीठांतर्गत आठ शासकीय, संलग्नित दोन व २७ खासगी विनाअनुदानित तत्त्वावर कार्यरत कृषी महाविद्यालयांमधून कृषी पदविका ते आचार्य पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. साठ हजारांवर कृषी पदविकाधारक, ३३ हजार ९२१ पदवीधारक (पशुवैद्यक शास्त्रसहित), नऊ हजार ९९३ पदव्युत्तर (पशुवैद्यक शास्त्रसहित) तसेच ६५५ आचार्य पदवीधारक निर्माण केले. २० आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी विद्यापीठातून शिक्षण घेतले.

दर्जेदार संशोधन

विद्यापीठाने दर्जेदार संशोधन केले असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची दखल घेतल्या गेली. आतापर्यंत विद्यापीठाने एकूण १३७१ सुधारित पीक उत्पादन तंत्रे, १५ संकरित वाणासह विविध पिकांच्या १६९ जाती, तसेच २३ कृषीविषयक यंत्रे व अवजारे प्रसारित केली आहेत. विद्यापीठाचे हे संशोधन कार्य १७ कृषी व कृषी अभियांत्रिकी विभाग आणि २५ कृषी संशोधन केंद्रांच्या माध्यमातून सुरू आहे.

विद्यापीठाचा केंद्रबिंदू हा शेतकरीवर्ग आहे. विद्यापीठाचे कार्य शेतकरी हित लक्षात घेऊनच केले जाते. ४९ वर्षांचा मोठा कालावधी विद्यापीठाने पूर्ण केला. आता सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त विविध शेतकरीभिमूख उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा, परिसंवाद घेण्यात येतील.     डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ.