बीड, नगरमध्ये परिस्थिती गंभीर; आतापर्यंत ४० टक्के भाग दुष्काळग्रस्त जाहीर

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी १५१ तालुक्यांच्या यादीत सर्वाधिक तालुके हे जळगाव जिल्ह्य़ातील असून, त्यापाठोपाठ बीड आणि नगर जिल्ह्य़ातील तालुक्यांचा समावेश आहे. पालघर जिल्ह्य़ातील तीन तालुक्यांचा यादीत समावेश असल्याने कोकणालाही दुष्काळाची झळ बसली आहे.

राज्य शासनाने बुधवारी सायंकाळी १५१ तालुके दुष्काळग्रस्त तालुके म्हणून जाहीर केले. राज्यात एकूण ३५८ तालुके असून, यापैकी आतापर्यंत १५१ म्हणजे ४० टक्के भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला आहे. १५१ पैकी गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असणाऱ्या तालुक्यांची संख्या ११२ असून, मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असणाऱ्या तालुक्यांची संख्या ३९ आहे. गेले काही वर्षे मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ वा टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील तालुक्यांचा समावेश आहे. पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्रात सर्वदूर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

जळगाव जिल्ह्य़ातील सर्वाधिक १३ तालुक्यांचा दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये समावेश आहे. अंमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळ, रावेर यावल हे तालुके दुष्काळग्रस्त तालुके म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

  • नगर (११ तालुके) – कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड
  • बीड ( ११ तालुके) – आष्टी, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, शिरुर, वडवणी, आंबेजोगाई, केज, परळी, पाटोदा
  • औरंगाबाद ( ९ तालुके) – औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर, कन्नड
  • सोलापूर (९ तालुके ) – करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर
  • जालना (७ तालुके) – अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफ्राबाद, जालना, परतूर
  • उस्मानाबाद ( ७ तालुके) – लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परंडा, तुळजापूर, वाशी, भूम.