24 January 2020

News Flash

सोलापूर जिल्ह्य़ात मुक्या जनावरांना जगवावं तरी कसं?

करमाळ्यात सुमारे सव्वा लाख मोठी जनावरे आहेत.

|| एजाजहुसेन मुजावर

एका बाजूला साखरपट्टा आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळी भाग अशी विसंगत ओळख सांगणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात यंदा दुष्काळाचे संकट १९७२च्या दुष्काळापेक्षाही तीव्र आहे. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांत कृषी उत्पादन प्रचंड घटले आहे. त्याचबरोबर तीव्र पाणीटंचाईशी झुंजणाऱ्या खेडय़ापाडय़ांतील ग्रामस्थांपुढे मुक्या जनावरांचा जीव कसा वाचवावा, असा प्रश्न आहे.

सांगोला, मंगळवेढा भागांतील उजाड रानात तहानलेली मुकी जनावरे आकाशाकडे पाहून हंबरडा फोडतात, तेव्हा त्यांचा आकांत शेतक ऱ्यांचे काळीज चिरून जातो. एप्रिल सरत आला तरी चारा छावण्यांचा पत्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारी दिलाशाची आशाच सोडून दिल्याचे चित्र दुष्काळी पट्टय़ात आढळते. सोलापूर जिल्ह्य़ात गेल्या पावसाळ्यात सरासरी जेमतेम १३८ मिलिमीटर एवढाच पाऊस पडला. उजनी धरणासह भीमा नदी आणि ‘सीना’काठच्या भागाचा अपवाद वगळता बहुतांश भाग कोरडाच राहिला आहे. सांगोला, मंगळवेढा, माढा, करमाळा, माळशिरस आदी भागांत दुष्काळाची तीव्रता मन अस्वस्थ करते. करमाळा भागात तर उजनी धरणाचा बॅकवॉटर परिसर सोडून अन्य भागात म्हणजे गुळसडी, सरपडोह, अंजनडोह, वरकटे आदी सुमारे २८ गावांमधील शेती दुष्काळाने पार उद्ध्वस्त केली आहे. परिणामी, तेथून किमान २० हजार नागरिकांनी पुणे, पिंपरी-चिंचवड भागांत यापूर्वीच स्थलांतर केले आहे. जनावरांना सांभाळण्यासाठी मागे राहिलेल्या ग्रामस्थांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

करमाळ्यात सुमारे सव्वा लाख मोठी जनावरे आहेत. त्यांच्यासाठी १४ चारा छावण्यांचे प्रस्ताव मंजूर झाले असले तरी अजून एकाही चारा छावणीचा पत्ता नाही. एका जनावरासाठी दररोज किमान ५० लिटर पाणी लागते. टँकरद्वारे मिळणारे पाणी पुरेसे नसल्याने काही शेतकरी खासगी टँकर मागवून पाणी विकत घेतात. सांगोला, मंगळवेढा, माढा, दक्षिण सोलापूर भागांत खासगी पाणी टँकरच्या धंद्याला बरकत आली आहे. प्रशासन १७८ गावे आणि १२०० वाडय़ांना १९४ टँकरद्वारे पाणी पुरवठा करते. हा केवळ दिलासा आहे, त्याने तहान भागत नाही, असे ग्रामस्थ सांगतात.

माढा भागात साखरपट्टय़ामुळे जनावरांना चारा म्हणून उसाचे वाढे दिले जायचे, पण आता कारखाने बंद झाल्यानंतर तेही मिळणे बंद झाले आहे. मंगळवेढा म्हणजे ज्वारीचे कोठार. सध्या या कोठारातच मराठवाडा आणि कर्नाटकातून ज्वारी मागवावी लागते. ज्वारीचा दर क्विंटलमागे चार हजारांच्या घरात गेला आहे. तर कडब्याचा दरही २५ हजारांपर्यंत आहे.

अस्वस्थ करणारे चित्र

सांगोला तालुक्यातील बेहरे चिंचोळी येथील दुष्काळाचे वास्तव अस्वस्थ करणारे होते. तेथील उजाड माळरानावर मुकी जनावरे वणवण भटकताना दिसतात. ती चारा-पाण्यासाठी आकाशाकडे पाहून जेव्हा हंबरडा फोडतात. त्यांचा हंबरणे काळीज चिरत जाते. सांगोल्यात एक लाख ६० हजार मुकी जनावरे आहेत. पोटच्या लेकरांसारखा सांभाळ केलेल्या जनावरांना ‘अनाथ’ करून सोडता येत नाही. चारा-पाणी नसल्याने त्यांना कसे जगवावे, असा   प्रश्न शेतकऱ्यांपुढे असल्याने विठ्ठल बेहरे या शेतक ऱ्याने सांगितले.

First Published on April 23, 2019 1:30 am

Web Title: drought in solapur
Next Stories
1 मालेगाव तालुक्यात पाचशे गुरांसाठी छावणी कार्यरत
2 कामायनी एक्सप्रेसच्या जनरल डब्याला आग, जीवितहानी नाही
3 मच्छीमारांनी स्वेच्छेने मतदान करावे, सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार समन्वय समितीचे आवाहन
Just Now!
X