गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीनंतर यंदा पश्चिम विदर्भावर कोरडय़ा दुष्काळाचे संकट घोंघावत असून पावसाने तब्बल २१ दिवसांची ओढ दिल्याने पिके कोमजण्यास सुरुवात झाली आहे. यवतमाळ जिल्ह्य़ात बिकट स्थिती असून या ठिकाणी सरासरीच्या केवळ ३३ टक्के पाऊस झाला आहे. 

पश्चिम विदर्भात पेरण्यांची कामे उशिरा सुरू झाली. जवळपास ९० टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपल्या. ज्या भागात दुबार-तिबार पेरणी करूनही उगवले नाही अशा भागात शेतकरी पुन्हा पेरणी करण्यास धजावले नाहीत. सुमारे १० टक्के क्षेत्र यंदा नापेर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विभागात सर्वाधिक १३ लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचा पेरा झाला आहे. ९ लाख हेक्टरमध्ये कपाशीची लागवड करण्यात आली आहे. मूग, उडीद या सारख्या कडधान्याच्या लागवडीत कमालीची घट झाली असून मुगाची लागवड केवळ २७ टक्के, तर उडिदाची सरासरीच्या केवळ २२ टक्के आहे. खरीप ज्वारीची लागवडही कमी झाली आहे. मूग आणि उडिदाच्या पेरणीचा कालावधी निघून जाईपर्यंत पाऊस न आल्याने शेतकऱ्यांच्या हातातून हे पीक गेले. पेरणीची ही स्थिती असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे. उभी पिके उन्हामुळे करपू लागली आहेत.
पावसाच्या या लहरीपणाचा फटका पीक उत्पादनावर जाणवणार असून कोरडवाहू क्षेत्रात मोठा विपरित परिणाम जाणवणार आहे. अमरावती जिल्ह्य़ात गेल्या महिन्यात २२ आणि २७ जुलैला चांगला पाऊस झाला, तेव्हापासून पावसाचा पत्ता नाही. पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्य़ांमध्ये अशीच स्थिती आहे. बुलढाणा जिल्ह्य़ात गेल्या १ जूनपासून आतापर्यंत २०२ मि.मी. (सरासरीच्या ४४ टक्के), अकोला जिल्ह्य़ात २८२ मि.मी. (५९ टक्के), वाशीम जिल्ह्य़ात २५९ मि.मी. (४७ टक्के), अमरावती जिल्ह्य़ात ४४२ मि.मी. (७९ टक्के), तर यवतमाळ जिल्ह्यात २१० मि.मी. म्हणजे सरासरीच्या केवळ ३३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण विभागात ५० टक्केच पाऊस झाला आहे.
पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पावसाच्या तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळी स्थिती घोषित केली आहे. मात्र, त्यातून अकोला आणि अमरावती हे दोन जिल्हे वगळल्याने या भागात रोष व्यक्त केला जात आहे. काठावरच्या तालुक्यांना दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांपासून वंचित रहावे लागणार आहे. सुमारे ३७ तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत अमरावती विभागात सरासरीच्या १४६ टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र स्थिती उलट आहे.

यवतमाळ जिल्ह्य़ात पिवळ्या मोझँकचे आक्रमण
अतिशय बिकट आíथक परिस्थितीत दुबार-तिबार पेरण्या करून शेती पिकविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. अतिशय तुरळक पावसाच्या भरवशावर जमिनीतून पिके उगविण्यात काही अंशी ते यशस्वी झाले, पण त्यांनतर पावसाने पाठ फिरवल्याने केवळ उमरखेड तालुकाच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्य़ात कोरडय़ा दुष्काळाच्या सावटात आहे. जिल्ह्य़ातील अनेक ठिकाणी पावसाअभावी पिके धोक्यात असल्याच्या तक्रारी आहेत.
उमरखेड तालुक्यात सोयाबीन, मूग व उडीद पिकांवर मोझँक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होउन उत्पादनात घट होईल. आधीच पावसाची वाट पाहात असलेला कास्तकार या रोगाच्या प्रादुर्भावाने अधिकच हवालदिल झाला आहे. मूग उडीद व सोयाबीन पिकांवर पिवळा माझ्ॉक रोगाची मोठय़ा प्रमाणात लागण होत असल्याचे चित्र असून वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. रब्बीतही अतिवृष्टी व तुरळक प्रमाणात गारपीट आणि आता पावसाच्या दुष्काळी परिस्थितीचा शेतकरी सामना करीत आहे. ओलिताची सोयाबीन पिके वाढीच्या, तर मूग व उडीद पीक शेंगा पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. पिवळा मोझंॅक रोगाची लागण झाल्यावर अल्पावधीतच पाने पिवळी पडून संपूर्ण झाड पडू लागले आहे. कालांतराने पूर्णच पीक वाळण्याची शक्यता आहे. रसशोषक कीडीत पांढऱ्या माशीमार्फत य पिवळा मोझ्ॉंक रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याची माहिती आहे.