आयुष्यभर ज्या ऊस उत्पादकांसाठी रस्त्यावर येऊन लढलो, पण त्याच ऊस उत्पादकांनी माझ्याशी गद्दारी केल्याने मला मताधिक्य मिळाले नाही. अशी खंत व्यक्त करताना, मात्र ज्या दुष्काळी जनतेने मोठे मताधिक्य देऊन माझ्यावर प्रेम केले त्या दुष्काळी जनतेच्या हितासाठी व प्रश्नांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा देणार असल्याची ग्वाही महायुतीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सदाभाऊ खोत यांनी दिली. जनतेने शब्द दिल्यास पुन्हा माढय़ातून लढणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
पत्रकारांशी बोलताना खोत म्हणाले, की माळशिरस विभागात ३० ते ३५ मतदान केंद्रांवरील प्रतिनिधी मतदानादिवशी सकाळी ११ वाजता घरी गेले व त्यांनी संघटनेचा विश्वासघात केला. त्यामुळे मला पराभव स्वीकारावा लागला, मात्र दुष्काळी जनतेला आपण काहीही न देता त्यांनी प्रामाणिकपणे अपेक्षेपेक्षा मोठे मताधिक्य दिले. पराभव झाल्याचे दु:ख आहे, मात्र महायुतीची सत्ता आली असताना व नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार असल्याने दुष्काळी पट्टय़ातील जनतेसाठी भरपूर काही करणार आहे. विजयी झालो असतो तर त्यांचे अनेक प्रश्न सुटले असते. आपल्या पराभवाने दुष्काळी जनता दु:खी झाली असल्याने वाईट वाटत असल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
वाळव्याच्या मतदानयादीतून नाव रद्द करून आपण माढा मतदारसंघातील मतदारयादीत नावाचा समावेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझा पराभव जनतेने व विरोधकांनी केला नाहीतर माझ्याच घरातील काही मंडळींनी केला. केवळ उत्तम जाणकर यांनी माझ्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली. त्यांना यापुढे ताकद दिली जाईल. आम्ही माळशिरसमध्ये गाफील राहिल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. दुष्काळी जनतेने कोणत्याही आमिषाला बळी न पडता खंबीरपणे साथ दिली. आता खटाव, माण, सांगोला भागातील दुष्काळी जनतेचे अश्रू पुसण्यासाठी यापुढे पूर्णवेळ कार्यरत राहणार असल्याचेही आश्वासन खोत यांनी दिले.