दुष्काळग्रस्तांसाठीचे पाहणी दौरे हा भंपकपणा आहे. दौरे करणाऱ्यांचे थोबाड पाहून प्रश्न सुटणार नाहीत, दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत होणे गरजेचे अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुष्काळग्रस्तांच्या दौऱ्यावर टीका केली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांचा उल्लेख न करता त्यांनी शाब्दिक प्रहार केला. कोल्हापूर व सांगली येथे दोन्ही ठिकाणी राजकीय प्रश्नांना बगल देत मंगळवारच्या कोल्हापूरच्या सभेत भाष्य करू असे स्पष्ट केले.    
राज्यातील काही भाग वर्षांनुवर्षे दुष्काळी आहे. पण या भागात तेच ते लोक निवडून येतात कसे, असा प्रश्न उपस्थित करून हा प्रकार बंद व्हावा आणि चांगला पर्याय द्यावा, असे म्हणत त्यांनी मनसेला संधी द्यावी, असे सूचित केले. दुष्काळग्रस्तांसाठी महामंडळ स्थापन करणे हा उपाय नव्हे त्याला मदत मिळणे, पिण्यास पाणी उपलब्ध करून देणे, जनावरांना चारा देणे ही कामे प्राधान्याने होण्याची गरज आहे.    
राज ठाकरे म्हणाले की, मुंबईत येणारे परराज्यातील लोंढे असंस्कृत व अडाणी असतात. त्यांच्यामुळे मुंबई बकाल होण्याबरोबर गुन्हेगारी वाढत आहे. मुंबईचे फॅशनेबल जग पाहून त्यांचे डोळे विस्तारतात. त्यांच्या हातून गुन्हेगारी कृत्य होत राहते. असे परकीय लोंढे खपवून घेतले जाणार नाहीत.