दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी गावपातळीवर विविध सामाजिक संघटना व व्यक्तींनी प्लास्टिकच्या पाणीसाठवण टाक्या पाठवल्या होत्या. प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या संस्थेसह दिल्लीतील उद्योगपती व आम आदमी पक्षाकडून पाठवलेल्या टाक्या जिल्हा प्रशासनाने दुष्काळी गावात ठेवण्यास पंचायत समिती मार्फत ग्रामसेवकांकडे दिल्या होत्या. मात्र, दोन वर्षांनंतर या टाक्या गावपुढाऱ्यांच्या घरी असल्याचे उघडकीस आले. साहजिकच दुष्काळातील टाक्याही पुढाऱ्यांनी सोडल्या नसल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात २०१३ मध्ये अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. गावागावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी विविध संस्थांना मदतीचे आवाहन केले होते. ग्रामीण भागात गावांमध्ये टँकरने आलेले पाणी साठवण करण्यासाठी टाक्यांची गरज होती. त्यातून दिल्लीतील काही उद्योगपती, आम आदमी पक्ष, तसेच चित्रपट अभिनेता सलमान खान याच्या सामाजिक संस्थेकडून पाण्याच्या टाक्या पाठवण्यात आल्या. पाटोदा पंचायत समितीकडे ६५ टाक्या देण्यात आल्यानंतर गावातील लोकसंख्येनुसार या टाक्या गावांसाठी ग्रामसेवकांकडे देण्यात आल्या. मात्र, गावपातळीवर ग्रामसेवक हा गावच्या पुढाऱ्यांच्या दबावाखाली असल्याने दुष्काळात गावासाठी आलेल्या पाणीसाठवण टाक्या चक्क पुढाऱ्यांनी आपल्या घरीच बसवल्याचे उघडकीस आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या या टाक्यांना पाय फुटले आणि पुढाऱ्यांच्या घरी विसावल्याने या वर्षी पुन्हा पाणीटंचाईत गावाला टाक्यांची गरज भासू लागली. टाक्यांचा वापर करणारे पुढारी दुष्काळातही गावासाठी टाकी देण्यास तयार नसल्याने अनेक ठिकाणी टाक्यांवरून पुढाऱ्यांमध्ये वादही झाले. मात्र, स्थानिक पातळीवर ग्रामसेवक व गटविकास अधिकारी या बाबत दुर्लक्ष करीत असल्याने गावासाठी टाक्या येऊनही गावाला मात्र त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. या बाबत तत्काळ चौकशी करावी आणि गाव पुढाऱ्यांकडील टाक्या गावासाठी वापरात आणाव्यात, अशी मागणी केली जात आहे.