News Flash

शेण घोटाळेबाजांना चारा छावण्यांपासून दूर ठेवण्याचे आदेश

महसूल विभागाची दुष्काळी जिल्ह्य़ांत सावधगिरी

महसूल विभागाची दुष्काळी जिल्ह्य़ांत सावधगिरी

चारा छावण्यांमध्ये शेणाचा हिशेब ठेवू नका तसेच पूर्वीच्या घोटाळेबाजांना छावण्यांपासून दूर ठेवा, असे सक्त आदेश महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दुष्काळी भागात सुरू केलेल्या चारा छावण्यांमध्ये शेणाचा भ्रष्टाचार झाल्याचे शिंतोडे अंगावर उडू नयेत म्हणून सरकारने सावधगिरी बाळगली आहे.

यापूर्वीच्या दुष्काळादरम्यान चारा छावण्यांमध्ये शेण घोटाळा झाल्याचे आरोप करीत विरोधकांनी सरकारला घेरल्याने निवडणुकीच्या तोंडावर आतापासूनच खबरदारी घेण्याच्या सूचना महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अपुऱ्या पावसामुळे यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने आतापर्यंत २६ जिल्ह्य़ांतील १५१ तालुक्यांत तसेच या १५१ तालुक्यांशिवाय २६८ महसूली मंडळामध्ये यापूर्वीच दुष्काळ जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे दुष्काळाची व्याप्ती लक्षात घेऊन गेल्याच आठवडय़ात आणखी ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने दुष्काळी भागात जनावरांसाठी मंडळनिहाय चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णयही शुक्रवारी काढण्यात आला.

यापूर्वी दुष्काळात चारा छावण्या सुरू केल्यावर तेथील भ्रष्टाचारामुळे सरकारची बदनामी झाली होती. काँग्रेस सरकारच्या काळात तर याच छावण्यांमध्ये झालेल्या शेणखत घोटाळ्याने सरकारची पंचाईत झाली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत विरोधकांच्या हाती घोटाळ्याचे कोणतेही अस्त्र मिळू नये याची सरकारने खबरदारी घेतली आहे.

साखर कारखाने, दूध संघ, खरेदी-विक्री संघ, बाजार समित्या यांनाच प्राधान्याने चारा छावण्या सुरू करण्याची परवानागी देण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्था किंवा खाजगी व्यक्तीं चारा छावण्या सुरू करण्यास पुढे आल्या तर ते कोणताही घोटाळा करणार नाही याचे हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. आजवर चारा छावण्यात निर्माण होणाऱ्या शेण खतावरूनच आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. त्यामुळे यावेळी छावणी उघडणाऱ्यांनाच शेणखत विकण्याची मुभा देण्यात आली असून त्याचा कोणताही हिशेब सरकार करणार नाही.

जनावरांसाठी ३५-७० रुपये अनुदान 

एका मंडळातील एका छावणीत साधारणत: २५० ते ५०० पर्यंत जनावरे ठेवण्यात येणार असून एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त पाच जनावरेच छावणीत ठेवता येतील. या जनावरांच्या चारापाण्यासाठी छावणीचालकांना मोठय़ा जनावरांसाठी दरदिवशी ७० रुपये तर छोटय़ा जनावरांसाठी ३५ रुपये या प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 1:57 am

Web Title: droughts in maharashtra 5
Next Stories
1 शब्दातही व्यक्त करता येत नाही इतका आनंदाचा क्षण – बाबासाहेब पुरंदरे
2 सोलापुरात वातानुकूलित सार्वजनिक स्वच्छतागृह
3 नीरव मोदीच्या किहीम येथील बंगल्यावर हातोडा
Just Now!
X