पूजा विधी करण्यासाठी पवनी येथे आलेल्या लाखनीच्या कुटुंबावर डोंगर कोसळला. पाटेघाटावर विधी करताना मुलगा बुडू लागला. पोटच्या गोळयाचा डोळयादेखत जीव जाताना पाहून जिवाची पर्वा न करता वडिलांनी नदीत उडी घेतली. मुलाला वाचविले. त्याला काठावर आणले. मात्र,घात झाला. पायऱ्यावरून पाय घसरला आणि वडील बुडाले.

शनिवारी दुपारी १ वाजता च्या सुमारास घडली. लीलाधर भीमराव हारोडे ( ६० )रा. समर्थनगर ,लाखनी हे लाखनीतील प्रसिद्ध डॉक्टर. अनेकांचे आजार दूर करून रुग्णांना आपलेसे करणारे लीलाधर धार्मिक वृतीचे. म्हणून आज त्यांनी पवनी येथील पाटेघाटावर पूजा ठेवली. याकरिता येथील पाटेघाटावर डॉ.लीलाधर,पत्नी साधना व मुलगा परेश हे तिघेही भूमेश्वर नामक महाराज यांच्यासह शांती व पूजा करण्यासाठी कारने येथे आले होते. पूजाविधी सुरू असताना त्यांचा मुलगा आंघोळ करीत होता.

मात्र,त्याचा पाय पायऱ्यांवरून घसरला. पाहता पाहता तो नदीत बुडू लागला. मला वाचवा मला वाचता ओरडू लागला.त्याच्या ओरडण्याने सर्वाचे लक्ष त्याच्याकडे गेले. लीलाधरही त्यावेळी तिथेच होते. मुलगा बुडताना पाहून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता ते पायऱ्यांवर आले. काठीच्या आधाराने त्यांनी बुडणाऱ्या मुलाला बाहेर काढले.

मुलगा वाचल्याचे समाधान असताच पायऱ्यावरून त्यांचा पाय अचानक घसरला. लीलाधर नदीत बुडू लागले. पाहता पाहता ते खोल डोहात बुडाले. काही कळायच्या आत होत्याचे नव्हते झाले. पाटेघाटावर कुटुंबींयाचा आक्रोश सुरू झाला. मासेमार नसल्याने त्यांना मदत करता आली नाही.