सहा तरुणांवर गुन्हा दाखल, स्थानिक गुन्हे विभागाची कारवाई

गांजाचा झुरका मारणे अलिबागमधील तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने गांजा ओढणाऱ्या सहा तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे कॉलेजमधील तरुण-तरुणींमध्ये वाढणाऱ्या वाढत्या व्यसनाधीनतेचे भीषण वास्तवही समोर आले आहे.

दोन महिन्यांपूर्वी अलिबागमध्ये गांजा तस्करीचे रॅकेट स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने उघडकीस आणले होते. या कारवाईनंतर अलिबागमधील अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुण-तरुणींना आळा बसेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाल्याचे दिसून येत नाही.

अलिबागमध्ये वरसोली येथील सुरूच्या बनात तरुण मुले गांजासारखे अमली पदार्थ सेवन करीत असल्याची माहिती खबऱ्याकडून स्थानिक गुन्हे अन्वेक्षण विभागाला कळली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जे. एस. शेख यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन सस्ते व त्यांच्या पथकाने वरसोली येथे जाऊन धाड टाकली. सुरूच्या वनात ६ जण गांजाचे सेवन करीत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात रात्री उशिरा एन.डी.पी.एस. १९८५ चे कलम ८ (क) २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. योगेश पवार (२०), रा. तळकरनगर, तोफिक शेख (२१), रा. लाब्बे कॉम्प्लेक्स, सफिना लॉज, नसीम अन्सारी (२०), रा. तळकरनगर, अंकेश सोनमले (१९), जलपाडा, झालखंड, राहुल पडवळ (१९), रोहिदासनगर, सिद्धार्थ चेवले (१९) मेंटपाडा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर सर्वावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे महाविद्यालयीन तरुण-तरुणींमधील वाढत्या अमली पदार्थ सेवनाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. अलिबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.