सोलापूर शहर व जिल्ह्य़ात सोमवारी धूलिवंदनाचा उत्सव पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात आला. गतवर्षी संपूर्ण जिल्ह्य़ात भीषण दुष्काळाचे संकट ओढवले असताना राजपूत समाजातर्फे पाण्याचा वापर टाळून कोरडय़ा रंगगाडयांची मिरवणूक काढण्यात आली होती. हीच परंपरा यंदा दुस-या वर्षीही कायम राखण्यात आल्याने हजारो लिटर पाण्याची बचत झाली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
काल रविवारी होलिकोत्सवानंतर सोमवारी दुस-या दिवशी धूलिवंदनाचा उत्सव साजरा करताना त्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात होता. एरव्ही सोलापूर शहर व परिसरात धूलिवंदनापेक्षा रंगपंचमीचा उत्सव जास्त प्रमाणात साजरा करण्याची पूर्वापार परंपरा आहे. महाराणा प्रतापसिंह राजपूत मध्यवर्ती संघटनेतर्फे चौपाड बालाजी मंदिरापासून रंगगाडय़ांची मिरवणूक काढली जाते. मागील सुमारे अडीचशे वर्षांपासूनची ही परंपरा आहे.राजस्थानी ढंगातील ढोलकीच्या तालावर गायली जाणारी ‘फाग’ लोकगीते ही या मिरवणुकीचे वैशिष्टय़ असते. तत्पूर्वी, मागील वर्षभरात समाजात ज्यांच्या घरातील व्यक्तीचे निधन झाले असेल, त्या घरात जाऊन संबंधित कुटुंबीयांना रंग लावून त्यांचे सूतक संपविले जाते. ही परंपरा आजही चालू आहे. त्यातून राजपुताना संस्कृतीची ओळख पटते.
तथापि, गत वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी उन्हाळ्याची चाहूल लागल्याच्या पार्श्र्वभूमीवर संभाव्य पाण्याची टंचाईच्या जाणिवेने धूलिवंदनाच्या उत्सवात पाण्याचा वापर न करता रंग खेळण्याचा स्तुत्य निर्णय समाजाने घेतल्याचे महाराणा प्रतापसिंह राजपूत मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष संजयसिंह चौहान यांनी सांगितले.
चौपाडातून वाजत-गाजत निघालेल्या या रंगगाडय़ांच्या मिरवणुकीत शेकडो राजपूत बांधव सहभागी झाले होते.यात सोलापूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह उज्ज्वलसिंह दीक्षित, दिलीपसिंह बायस, अ‍ॅड. प्रदीपसिंह राजपूत, धनराज दीक्षित आदींचा प्रामुख्याने सहभाग होता. मंगळवार पेठेतील मारवाडी समाजाच्या बालाजी मंदिरात पोहोचल्यानंतर तेथे बालाजीच्या मूर्तीवर रंग उधळला गेला. तेथून ही मिरवणूक पारंपरिक मार्गावरून सायंकाळी उशिरा चौपाड बालाजी मंदिरात येऊन विसर्जित झाली.