पुढील पाच वर्षांसाठी राज्यात सर्वत्र ‘कोरडवाहू शेती अभियान’ राबविण्यात येणार असून त्यासाठी १० हजार कोटी रूपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. रविवारी येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित पहिल्या अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते स्वागताध्यक्ष म्हणून बोलत होते.
महाराष्ट्र शासनाचा कृषी व पणन विभाग आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. रं. बोराडे यांनी भूषविले. स्वामी समर्थ सेवा केंद्राचे अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. प्रारंभी कृषी दिंडीही काढण्यात आली. शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्या साहित्यातून उमटाव्यात, शासनाची भूमिका त्यांना समजावून सांगावी या उद्देशाने कृषी संमेलन भरविण्यात आल्याचे विखे यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या कथा, व्यथा, समस्या साहित्याच्या माध्यमातून पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.