विदर्भात पावसाअभावी मत्स्यबीज उत्पादन ठप्प

प्रशांत देशमुख, वर्धा

पावसाअभावी कोरडय़ा पडलेल्या जलाशयामुळे यावर्षी मत्स्यबीज उत्पादन ठप्प पडले असून शेकडो मच्छीमार व शेततळय़ातून मत्स्यपालन करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. परिणामी, मत्स्यशेतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जून आणि जुलैमध्येच मासोळय़ा अंडी टाकतात, पण आता अर्धा जुलै संपूनही जलाशय कोरडेच असल्याने उत्पादनाचे प्रमाण शून्य आहे.

पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा वगळता उर्वरित जिल्हय़ात मत्स्यशेतीवर संकट उद्भवले आहे. भंडारा, चंद्रपूर येथे मोगरा बांधावर मोठय़ा प्रमाणात बीज तयार केले जाते. पण बीज तयार होऊनही साठवणुकीसाठी पाणी नसल्याने मत्स्यबीज वाया जाण्याची दाट शक्यता व्यक्त आहे. सध्या काही तलावातील पाण्याच्या मृतसाठय़ावर भिस्त आहे, पण त्यातून २५ ते ३० टक्केच मत्स्यबीज अपेक्षित आहे. याखेरीज अलीकडच्या काळात शेततळय़ातून मच्छीपालन म्हणजेच मत्स्यशेती विकसित होऊ लागली आहे. पण, पावसाअभावी ही शेतीसुद्धा आता कोमेजली आहे.

पूर्व विदर्भातील चारशेवर सहकारी मच्छीमार संस्था आता आकाशाकडे डोळे लावून बसल्या आहेत. पेंच प्रकल्प परिसरात शंभर एकरचा परिसर मच्छीपालनासाठी निश्चित करण्यात आला आहे. पण, पाण्याअभावी हा परिसरसुद्धा कोरडाठाक पडला आहे.

वर्धा जिल्हय़ात बोर आणि केळझर येथे मत्स्यबीजोत्पादन केंद्र आहे. चार कोटी बीज या ठिकाणी तयार होते. पण, पावसावर अवलंबून असलेल्या या दोन्ही केंद्रात बीज उत्पादनाची प्रक्रिया ठप्प आहे. जिल्हय़ातील पाठबंधारे खात्याचे ३१ प्रकल्प तसेच ८० शेततळय़ामार्फत ८ हजार ६०० हेक्टरचा परिसर मत्स्यबीज उत्पादनासाठी राखीव आहे. त्यातून दरवर्षी ३ हजार मेट्रिक टन माशांचे उत्पादन होते. गेल्यावर्षी त्याद्वारे १९ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले होते. ४ कोटी मत्स्यबीजातून केवळ १० टक्के म्हणजे ४० लाख बोटुकले तयार होतात. अंडय़ातून बाहेर पडलेली पिल्ले दहा दिवसांनंतर ५० मिमीची झाल्यावर त्यांना बोटुकले म्हटले जाते. हे बोटुकले मच्छीमार संस्थांना विकले जातात. या संस्थांवरच बोटुकल्यांचे पालन करण्याची जबाबदारी असते. दरवर्षी ४० लाख बोटुकले तयार होतात. यावर्षी ७३ लाखांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, पण ते शक्य नसल्याने अन्य जिल्हय़ांतून किंवा परप्रांतातून बोटुकले आणावे लागत आहेत. बाहेरून मत्स्यबीज आणणे व जगवणे शक्य नसल्याने बोटुकलेच आणावे लागतात. अलीकडच्या काळात शेततळीधारक ९० शेतकऱ्यांनी मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. पण, पावसाअभावी त्यांच्यावरही गंडांतर आले. त्यांना गतवर्षी ८३ मे.ट. उत्पादन मिळाले होते. यातील एक नमुनेदार उदाहरण देवळी तालुक्यातील मनोहर मसराम या शेततळीधारकाचे दिले जाते. त्यांनी ३० बाय ३०  आकाराचे शेततळे तयार केले आहे. मत्स्यपालन विभागातर्फे  एक हजार बोटुकले पुरवण्यात आले. त्यांनी शेणखत व खाद्य म्हणून शेंगदाणा ढेप व भाताचा कोंडा यावर दोन हजर रुपये खर्च केले.

बोटुकले विकसित झाल्यानंतर पाऊण ते सव्वा किलोचा मासा विक्रीसाठी उपलब्ध झाला. दोनशे किलोच्या विक्रीतून त्यांना चौदा हजार रुपयांचे उत्पन्न झाले. खर्च वजा जाता बारा हजार रुपयांचा नफा मिळालेले मनोहर मसराम यावर्षी चिंताग्रस्त आहेत. तळे आटले असून बीजोत्पादन शक्य नाही. पुढील १५ दिवसात समाधानकारक पाऊस झाल्यासच बोटुकले वाढवता येतील. नागपूर विभागात २०१७-१८पासून ‘तलाव तेथे मासोळी’ हे अभियान सुरू आहे. मत्स्यबीजापासून मत्स्य बोटुकले वाढीसाठी जूनपासून पहिला टप्पा सुरू होतो, परंतु पुरेसा पाणीसाठा नसल्याने या अभियानावर संक्रांत आली आहे.

पाणीच नसल्याने यावर्षीचे मत्स्यबीज उत्पादन ठप्प पडले आहे. जुलैअखेर मत्स्य बोटुकले आणावे लागतील. अन्यथा मच्छीमार संस्था व त्यावर अवलंबून असलेले २२०० क्रियाशील मच्छीमार यांचा व्यवसाय संपुष्टात येईल. चंद्रपूर व गडचिरोली येथून बोटुकले आणण्याचे नियोजन आहे. यावर्षी मत्स्यबाजार तेजीत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

– मत्स्यपालन अधिकारी, एस.बी. डोगले