पूरग्रस्त कुरुंदवाडजवळ कोरडी जागा, सुकी लाकडे मिळेनात

मुंबई : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूर ओसरत असला तरी कृष्णा—पंचगंगेच्या संगमाजवळच्या कुरुंदवाड आणि काही गावांतील पूर पूर्णपणे ओसरलेला नाही. गेल्या आठवडय़ात मंगळवारीच गावातील सुरक्षित जागी सर्वानी आसरा घेतला असला तरी काही वेगळी संकटेदेखील होतीच. संपूर्ण गावालाच पुराने वेढल्यामुळे या काळात मृत्यु झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी कोरडी जागा आणि कोरडी लाकडं मिळवण्यासाठी गावकऱ्यांना वेगळीच पायपीट करावी लागली. चहूबाजूने पाण्याने वेढलेल्या परिस्थितीत सुरक्षित जागी थांबलेल्या गावकऱ्यांपैकी कोणी मृत्युमुखी पडलेच तर काय करायचे हा प्रश्न होताच. तशीच वेळ कुरुंदवाडमधील गावकऱ्यांवर आली.

गेल्या चार दिवसांत येथे दोघांचा नैसर्गिक मृत्यु झाला. अंत्यसंस्काराची नेहमीची जागा कृष्णेच्या तीरावरील बांधलेल्या घाटावर. पण इथपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही. सगळीकडे पाणीच पाणी. गावातल्या लाकडाच्या वखारीदेखील पाण्यातच. बाहेर पडायचे मार्ग पण बंद. गावाच्या माळभागात काही ठिकाणी थोडीशी मोकळी जागा होती. दोन दिवस पाऊस नसल्यामुळे काहीशी कोरडी झालेली. माळभागावरुनच पुढे टाकळीवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरचे पाणी काहीसे ओसरले होते. टाकळीवाडीत एक वखार पुरापासून वाचलेली. अखेरीस १२ मण लाकडे १० किमीवरून एका ट्रॅक्टरमधून आणण्यात आली. दुसरीकडे अडचण होती ती मृतदेह कोरडय़ा जागेपर्यंत कसा न्यायचा? बाजारपेठेतलं पाणी ओसरलं असलं तरी थिएटर चौकात पाणी होतंच. शेवटी गुडघाभर पाण्यातून ट्रॅक्टरमधून मृतदेह नेण्यात आला. माळभागातल्या दत्त महाविद्यलयापासून पुढे काही अंतरावरच्या मोकळ्या आणि कोरडय़ा जागेत अखेरीस अंत्यसंस्कार करण्यात आले.  पाणी काही प्रमाणात ओसरल्यावर हा प्रसंग आल्यामुळे हे सोपस्कार तरी करता आले, अन्यथा पाणी ओसरेपर्यंत मृतदेह अंत्यसंस्काराविना तसेच ठेवावे लागले असते.