गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके अर्थात डी. एस. कुलकर्णी यांच्या १३ आलिशान गाड्यांचा लिलाव केला जाणार आहे. डीएसकेंना अटक केल्यानंतर या १३ गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. या सगळ्या कार्सचा लिलाव करण्याची परवानगी आता न्यायालयाने दिली आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके १७ फेब्रुवारी २०१८ पासून अटकेत आहेत.त्यांना अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या बीएमडब्ल्यू, टोयोटा, पोर्श, हुंदाई या कंपनीच्या चारचाकी आणि ऑगस्टा कंपनीची दुचाकी यासह एकूण १३ गाड्या जप्त केल्या होत्या. या सगळ्या वाहनांची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. तसेच त्यांचा लिलाव करण्याची परवानीही मागितली जी आता न्यायालयाने दिली आहे.

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना २०१८ मध्ये अटक करण्यात आली. डी. एस. कुलकर्णी यांनी ठेवीदारांची रक्कम परत करण्यासाठी वेळोवेळी उच्च न्यायालयाकडून मुदत घेतली होती. अटक होण्याच्या आठ महिने आधीपासून ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी त्यांनी वेळोवेळी मुदत मागितली. एकवेळ भीक मागावी पण डीएसकेंनी लोकांचे पैसे उभे करावेत असे म्हणत कोर्टाने डीएसकेंना फटकारले होते. आता त्यांच्या १३ आलिशान गाड्यांचा लिलाव करण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे.