एजाजहुसेन मुजावर

दुर्दैवी बागवान कुटुंबीयांवर दुहेरी संकट

एव्हरेस्ट शिखर सर करून खाली परत येत असताना प्राणाला मुकलेला अकलूजचा निहाल बागवान याचा मृतदेह शुक्रवारी सहा दिवसानंतर अकलूजमध्ये आणण्यात आला. दुपारी शोकाकूल वातावरणात त्याच्या

पार्थिवावर दफनविधी करण्यात आला. मात्र या दु:खद घटनेमुळे मुळातच आर्थिकदृष्टय़ा गरीब असलेले बागवान कुटुंबीय आणखी अडचणीत सापडले आहे. निहालच्या या मोहिमेसाठी समाजातून आर्थिक मदत झाली असली तरी कुटुंबीयांनी काही नातेवाईक व आप्तेष्टांसह सावकारांकडून कर्जाऊ रक्कम घेतली आहे. निहाल तर सोडून गेलाच, पण आता ही कर्जाऊ रक्कम कशी परत करायची याची विवंचना बागवान कुटुंबीयांना लागली आहे.

गिर्यारोहक निहाल अशपाक बागवान (वय २६) याचे गेल्या २४ मे रोजी एव्हरेस्ट शिखर सर करून परतत असताना वाटेत निधन झाले.

निहाल बागवान याच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याचे वडील अशपाक बागवान यांचे पान-तंबाखू विक्रीचे छोटेसे दुकान आहे. धाकटा मुलगा जुनैद हा वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करत शिक्षण घेत आहे.

निहाल यास लहानपणापासून गिरिभ्रमणाचा छंद  होता. अलीकडेच त्याने एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी तयारी सुरू केली होती. मात्र या मोहिमेसाठी येणारा खर्च १९ लाखांच्या घरात होता. यासाठी त्याने मदतीचे आवाहन केले होते. यानुसार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सहा लाखांपर्यंतची आर्थिक मदत त्यास उपलब्ध करून दिली. अन्य काही मंडळींकडून एक लाखांची मदत मिळाली. मात्र उर्वरित १२ लाखांची तजवीज करायची होती. तेव्हा बागवान कुटुंबीयांनी काही नातेवाईक, आप्तेष्टांकडून हात उसने रक्कम घेतली. काही सावकारांकडूनही कर्जाऊ रक्कम घेण्यात आली.  ही संपूर्ण रक्कम निहाल एव्हरेस्ट सर करून परत आल्यानंतर परत करण्याचे ठरले होते. या मोहिमेत यश मिळाल्यावर समाजातून हा निधी उभा करण्याचा त्यांचा मानस होता.  मात्र हे शिखर सर करून उतरत असताना त्याला वाटेतच मृत्यूने गाठले. निहालच गेल्याने आता त्याने घेतलेल्या या कर्जाऊ रकमेची परतफेड कशी करायची, याची चिंता बागवान कुटुंबीयांपुढे उभी राहिली आहे.

अकलूजसाठी अभिमान वाटावा अशी कामगिरी करणारा निहाल बागवान एका गरीब कुटुंबातील मेहनती व जिद्दी तरूण होता. त्याने एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर आम्हाला अतिशय आनंद झाला होता, त्याचे जंगी स्वागत करणार होतो. परंतु दुर्दैवाने त्याच्यावर मृत्यूने झडप घातली. त्याच्या कुटुंबीयांना शासनाची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.

– विजयसिंह मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री

निहाल हा लहानपणापासून लाडका होता. तो जिद्दी आणि कष्टाळू होता. त्याने केवळ जिद्द बाळगून एव्हरेस्ट शिखर सर केले. तो परत आला असता तर निश्चितच शासनाकडून त्याचा गौरव झाला असता, त्याला चांगली नोकरी मिळाली असती. पण त्याच्या मृत्यूमुळे आम्हांवर  संकट कोसळले आहे. हातचा मुलगा तर गेलाच, तो काही परत येणार नाही. परंतु आता देणेक ऱ्यांचे पैसे कसे परत करायचे, याची चिंता आहे.

-अशपाक बागवान,निहालचे वडील